शारीरिक व मानसिक प्रगतीसाठी त्रिबंधात्मक प्राणायाम

प्राणायाम आणि शरिराचे विविध बंध यांचे फारच जवळचे नाते आहे. जालंधर बंध, उडियान बंध आणि मूलबंध तसेच या तीनही बंधांचा संयोग असलेला महाबंध हा प्राणायामाची उपयुक्तता वाढवतो. केवळ चांगला बंध साधला म्हणजे प्राणायाम साधला असे न मानता, श्‍वास, कुंभक, रेचक, पूरक याचाही साकल्याने विचार होणे आवश्‍यक असते. म्हणून ज्याने अचूक बंध साधला, त्याने श्‍वासावरही तितकेच लक्ष केंद्रित करणे आवश्‍यक असते. प्राणायाम हा सर्वच बाबतीत श्रेष्ठ योगप्रकार असून त्यासाठी अधिक मेहनत घ्यायची तयारी असणे आवश्‍यक आहे.

प्राणायामातील उपयुक्‍त बंध मंत्र
प्राणायाम करताना ज्याप्रमाणे दीर्घश्‍वसन, अनुलोम -विलोम, कपालभाती, भ्रमरी, भ्रामरी, उज्जयी, सूर्यभेदन, चंद्रभेदन, असे विविध प्रकारचे प्राणायाम शिकवून केले जातात. हे सर्व प्राणायाम बंध बांधून केले असता त्याचा जास्त फायदा प्राणायाम करणाऱ्याला मिळतो. योगासने झाल्यावर रोज प्राणायाम बंध बांधून केल्यामुळे आपल्या शरीरातील बाहेर जाणारी शक्‍ती बाहेर जाण्याची थांबते व या बाहेर जाणाऱ्या शक्‍तीचा उपयोग हा शरीरांतर्गत कार्यासाठी करता येतो.

बंध म्हणजे काय?
बंध या शब्दाचा अर्थ मर्यादा, बंध म्हणजे बांधणे, रोखून धरणे, मार्ग थांबवून किंवा थोपवून धरणे होय. प्राणायाम करताना प्राणाचा आयाम केला जातो म्हणजेच श्‍वास हा जास्तीत जास्त लांबवत घेतला जातो व सोडला जातो. ही क्रिया करत असताना मध्ये श्‍वास थोपवून धरणे बंध तंत्रामुळे शक्‍य होते. बंध हे अशाप्रकारे प्राणायामाला सहाय्यक असतात. हे बंध बांधल्याशिवाय प्राणायामाचा शास्त्रोक्‍त अभ्यास पूर्ण होऊ शकत नाही.
बंधाचे मुख्यत्वे तीन प्रकार आहेत

जालंधर बंध –
पद्मासन किंवा सिद्धासनात बसून हा बंध बांधतात. प्रथम भरपूर श्‍वास म्हणजेच पूरक करावे. दोन्ही हात गुडघ्यावर टेकवून हनुवटी कंठखूपेत नेऊन “जालंधर बंध’ बांधता येतो. हा बंध बांधताना दृष्टीस्थिर ठेवावी. छाती पुढे ताणून हा बंध बांधतात. जालंधर बंधामुळे कंठस्थानातील नाड्यांचे जाळे स्प्रिंगप्रमाणे दाबून बांधले जाते. जालंदरबंधामुळे घशाचे विकार दूर होतात. तसेच गळ्याभोवतीची निष्कारण वाढवून लोंबणारी त्वच्या कमी व्हायला मदत होते. जालंधरबंधामुळे गळा सुरेख, वाणी गोड होते.

कंठाचे आकुंचन केल्यामुळे इडा पिंगला नाड्या बंद होतात व प्राण सुषुम्ना नाडीत प्रवेश करतो. गळ्याच्या अथवा मानेच्या विविध रोगांवर हा जालंधर बंध उपयुक्‍त आहे. थायरॉईड, टॉन्सील या रोगांवर उपाय योजना करतो तसेच विशुद्धच्रक जागृती होते म्हणून प्रत्येकाने रोज प्राणायाम करताना जालंधर बंध बांधलाच पाहिजे.

उडीयान बंध –
उभे राहूनही हा बंध बांधता येतो. फक्‍त दोन्ही हात गुडघ्यावर ठेवून श्‍वास सोडून पोट ढिले सोडावे. पोटाचे स्नायू छातीपर्यंत उचलून पोटाचा चांगला खड्डा म्हणजेच खपाटी निर्माण झाली पाहिजे. स्नायू असे उचलावे की पोट व कंबर एकत्र खपाटीला जायला हवे पण सर्वांना लगेचच जमेल असे नाही. तसा उडियानबंध हा बांधायला अवघड आहे. पण सरावाने तो जमू शकतो. सुरूवातीला तो जमेल तसाच यथाशक्‍ती बांधावा. तीन वेळा सुरुवातीला उडीयान बंध बांधण्याची प्रॅक्‍टिस करावी.

उडियान बंधाचा अभ्यास हा तज्ञ योगशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली साधकाने हळूहळू अभ्यास वाढवावा. ज्यांची पोटाची ऑपरेशन्स झाली असतील त्यांनी लगोलग हा बंध बांधू नये. हा बंध चुकीचा बांधल्यास त्याचे वाईट परिणाम शरीरावर होऊ शकतात म्हणून योग तज्ञाच्या मार्गदर्शनाने खात्रीशीर अचूक उडियानबंध बांधावा. तो योग्य प्रकारे बांधला गेला आहे का नाही हे चाचपडून पहावे.

उडियान बंधामुळे पोटातील आजार दूर होतात तसेच पचनशक्‍ती चांगली कार्यरत होते. पोटातील स्त्राव चांगल्याप्रकारे स्त्रवतात. पचनाच्या तक्रारी दूर होतात. मात्र उडियानबंध हा अचूक केला की नाही तपासून पाहिले पाहिजे.उडियानबंधामुळे मणिपूर चक्राची जागृती होते.

मूलबंध –
मूलबंध बांधताना तो बाह्य किंवा अंर्तगत कुंभक करुन गुदद्वाराचे व मूत्रेंद्रियाचे सर्व स्नायू वर खेचावेत. कदाचित खेचताना ते सोडले जाण्याची शक्‍यता असते. पण आपण प्रयत्न करावा. मूलबंध बांधताना बेंबी अथवा नाभीखालचा भाग चांगला जोरात खेचून वर ओढावा. या बंधात अपान वायूचे उर्ध्वगमन होते.

मुलाधार चक्र शुद्ध व जागृत होते व कुंडलीनी शक्‍ती जागृक होते. हे सर्व ज्यावेळी मूलबंध शास्त्रोक्‍त पद्धतीने करता येतो. त्यावेळेसच मुलाधारचक्र शुद्धी होते. मुलबंध बांधल्यामुळे अनेक फायदे शरीराला होतात. यामुळे बद्धकोष्ठता जाते, जठराग्नि चांगल्या प्रकारे प्रज्वलित होतो. त्यामुळे भूक चांगली लागते. विशेष म्हणजे जे लोक ब्रह्मचर्याचे काटेकोर पालन करीत असतात त्यांना या मूलाधार बंधाचे अनेक फायदे मिळतात. म्हणूनच ब्रह्मचर्य पालनासाठी हा बंध महत्त्वपूर्ण आहे.

महाबंध –
वरील तीनही बंध एकसाथ पद्मासनात अथवा सिद्धासनात बसून बांधले की महाबंध बांधला असे म्हणतात. एखादा प्राणायाम करताना प्रथम जालंधर बंध मग उडियानबंध आणि मग मुलबंध बांधला जातो. बहुतेकवेळा जालंधर बंध बांधला की मुल आणि उडियानबंध आपोआप बांधले जातात. जालंधर बंध बांधताच कुंभक करावे आणि कुंभकात कोणतेच बंध न सोडतात. बंध तपासून पहावेत.

महाबंधाचे फायदे
जालधंर, उडियान आणि मूल हे तीनही बंध बांधून रोज नियमितपणे प्राणायामाचे प्रकार केल्यास आपली प्रकृती उत्तम रहाते. या महाबंधामुळे प्राणशुद्धी तर होतेच पण बल प्राप्ती व वीर्यशुद्धी देखिल होते. महाबंधामुळे इडा पिंगला सुषुम्ना यांच्या मिलनातून फायदा मिळतो.
आपल्या शरिराची रोगप्रतिकारक शक्‍ती वाढते. वजन कमी होते. उत्साहवर्धक वाटते. आपले शरीर व्याधीमुक्‍त होते.

अशाप्रकारे प्राणायामाचा कोणताही प्रकार करताना त्रिबंधयुक्‍त प्राणायाम करणे अत्यंत आवश्‍यक आहे. हळूहळू अशापद्धतीने त्रिबंधयुक्‍त प्राणायामाचा कालावधी वाढवता येतो. सुरूवातीला झेपेल एवढाच त्रिबंधयुक्‍त प्राणायाम करावा. उदा. त्रिबंधयुक्‍त अनुलोम-विलोम. पहिल्या दिवशी दोन मिनिटे केला. दुसऱ्या दिवशी अजून एक मिनिट वाढवले असे करत दहा मिनिटापर्यंत एका त्रिबंधयुक्‍त प्राणायामाची प्रॅक्‍टिस करता येते. पुढे पुढे तर अर्धा तास करणारे साधकदेखिल आहेत. बंध हा बांधता आला पाहिजे. तसेच तो प्राणायामाची ती विशिष्ट क्रिया संपवताना सोडतानादेखील शास्त्रोक्‍त पद्धतीने आला पाहिजे. त्रिबंध सोडताना प्रथम जालंधर, मूल आणि शेवटी उडियान सोडावा.योग्य योगशिक्षकाचे मार्गदर्शन बंध बांधताना व सोडतानादेखील हवे.

सुजाता टिकेकर


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)