शारापोव्हाचे आव्हान चौथ्याच फेरीत संपुष्टात 

“बर्थ डे गर्ल’ सुआरेझ नवारोकडून सनसनाटी पराभव 
अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा 
न्यूयॉर्क – उत्तेजक सेवनाच्या आरोपावरून बंदीच्या शिक्षेतून परतल्यावर पुनरागमनासाठी प्रयत्नशील असलेल्या मारिया शारापोव्हाला अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीच्या चौथ्या फेरीत पराभवाचा धक्‍का बसला. कालच आपला तिसावा वाढदिवस साजरा करणारी “बर्थ डे गर्ल’ स्पेनची कार्ला सुआरेझ नवारो हिने मारिया शारापोव्हाचे आव्हान 6-4, 6-3 असे सरळ सेटमध्ये संपुष्टात आणताना तब्बल पाच वर्षांनंतर अमेरिकन ओपनच्या उपान्त्यपूर्व फेरीत धडक मारली.

याआधी 2006 मध्ये अमेरिकन ओपनचे विजेतेपद संपादन करणारी मारिया शारापोव्हा 2012 नंतर पहिल्यांदाच या स्पर्धेत उपान्त्यपूर्व फेरी गाठण्यासाठी प्रयत्न करीत होती. परंतु तब्बल 38 नाहक चुका आणि प्रतिस्पर्धी कार्ला सुआरेझ नवारोला सहा वेळा आपली सर्व्हिस भेदण्याची तिने दिलेली संधी यामुळे शारापोव्हाने आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला. फ्लशिंग मेडोज टेनिससंकुलातील रात्रीच्या सत्रात आतापर्यंतचे सर्व 23 सामने जिंकण्याचा शारापोव्हाचा विक्रम या पराभवामुळे खंडित झाला. त्यातील 22 विजय तिने केवळ ऑर्थर ऍश स्टेडियमवर मिळविले होते.

त्याउलट तिसावा वाढदिवस सनसनाटी विजयाने साजरा करणाऱ्या सुआरेझ नवारोने अमेरिकन ओपनमध्ये 2013 नंतर पहिल्यांदाच उपान्त्यपूर्व फेरी गाठली आहे. शारापोव्हाविरुद्धच्या सहा लढतींपैकी नवारोचा हा केवळ दुसराच विजय ठरला. रात्रीच्या सत्रात मारियाला पराभूत करण्यासाठी मला आक्रमक खेळ करणे गरजेचे होते आणि मी नेमके तेवढेच केले, असे नवारोने सांगितले.

उपान्त्यपूर्व फेरीत नवारोसमोर अमेरिकेच्या 14व्या मानांकित मॅडिसन कीजचे कडवे आव्हान आहे. कीज अमेरिकन असल्यामुळे येथील प्रेक्षक तिलाच पाठिंबा देतील. त्यामुळे या लढतीत आपल्यासमोर दुहेरी आव्हान राहील, असेही नवारोने सांगितले. कीजने आपली घोडदौड कायम राखताना स्लोव्हाकियाच्या 29व्या मानांकित डॉमिनिका चिबुल्कोव्हचे आव्हान 6-1, 6-3 असे सहज मोडून काढत उपान्त्यपूर्व फेरी गाठली.

महिला एकेरीतील अखेरच्या उपान्त्यपूर्व सामन्यात जपानच्या विसाव्या मानांकित नाओमी ओसाकासमोर युक्रेनच्या बिगरमानांकित लेसिया त्सुरेन्कोचे आव्हान आहे. ओसाकाने अखेरच्या सेटमध्ये एका ब्रेकच्या पिछाडीवरून पुनरागमन करताना बेलारूसच्या 26व्या मानांकित आर्यना सबालेन्काचे कडवे आव्हान 6-3, 2-6, 6-4 असे तीन सेटच्या लढतीनंतर मोडून काढले.

या विजयामुळे 2004 नंतर अमेरिकन ओपनची उपान्त्यपूर्व फेरी गाठणारी ओसाका ही पहिली जपानी खेळाडू ठरली. त्यावेळी शिनोबू आसागोने ही कामगिरी केली होती. चौथ्या फेरीतील अखेरच्या लढतीत त्सुरेन्कोने झेक टीनएजर मार्केटा व्होन्ड्रुसोव्हाचा प्रखर प्रतिकार 6-7, 7-5, 6-2 असा मोडून काढला. त्सुरेन्कोने दुसऱ्या फेरीत द्वितीय मानांकित व ऑस्ट्रेलियन ओपन विजेत्या कॅरोलिन वोझ्नियाकीवर मात करताना सनसनाटी निकालाची नोंद केली होती.

महिला एकेरीतील पहिल्या उपान्त्यपूर्व लढतीत सहा वेळच्या माजी विजेत्या सेरेनासमोर उपान्त्यपूर्व फेरीत झेक प्रजासत्ताकाच्या आठव्या मानांकित कॅरोलिना प्लिस्कोव्हाचे आव्हान आहे. तसेच दुसऱ्या उपान्त्यपूर्व लढतीत गतविजेत्या व तृतीय मानांकित स्लोन स्टीफन्ससमोर लात्वियाच्या 19व्या मानांकित ऍनेस्तेशिया सेवास्तोव्हाचे आव्हान आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)