!! शारदीय नवरात्र !! (प्रभात open house)

अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून शरद ऋतूचे आगमन होते. प्रतिपदेपासून नवमी पर्यंत साजऱ्या होणाऱ्या देवीच्या या उत्सवास शारदीय नवरात्र म्हणतात. नऊ दिवस चालणारा सृजनाचा उत्सव…
नवरात्र महोत्सव हा देवीचा म्हणजे शक्ती उपासनेचा …
नऊ दिवस आदिशक्तीची आराधना करण्याचा आहे.

ब्रह्मांडातील आदिशक्ती आदिमायेची मनोभावे पूजा करणे म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव. घटरूपी ब्रम्हांडात मारक चैतन्यासहीत अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे अखंड तेवणार्‍या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे म्हणजेच नवरात्रोत्सव साजरा करणे.

-Ads-

सर्व देवांच्या ठिकाणी असलेल्या शक्तींचे दैवतीकरण होऊन त्या शक्तीरूप मूर्तीला देवी असे नाव मिळाले आणि शाक्त संप्रदायी लोकांनी तिला सर्वश्रेष्ठ देवता आदिमाया व जगदंबा म्हणून गौरविले.

देवीची उग्र व सौम्य अशी दोन रूपे पाहावयास मिळतात. उमा, गौरी, पार्वती, भवानी, जगदंबा ही देवीची सौम्य रूपाची नावे तर दुर्गा, भैरवी, चामुंडा ही देवीची उग्र रूपे आहेत.

या काळात दुर्गा देवी तेजतत्वाच्या आधारे आपल्या नऊ प्रमुख शस्त्रांसहीत ब्रम्हांडात विहार करते असा समज आहे. वाघावर आरूढ झालेली हातात तलवार खड्ग आदी शस्त्रे धारण केलेली देवीची मूर्ती. शास्त्राप्रमाणे नवरात्रीत नऊ वेगवेगळ्या रंगांचेही महत्त्व आहे.

नवरात्र हा ऋतू परिवर्तनाचा काळ असतो. त्यामुळे आपल्यात नवीन शक्ती, नवा उत्साह, उमेद निर्माण होत असते. बृहत् संहितेनुसार सूर्य तसेच इतर ग्रहांमध्ये होणाऱ्या परिवर्तनाचा प्रभाव मनुष्याच्या आरोग्यावर व व्यवहारांवर होत असतो. सृष्टीतील परिवर्तन हा शक्तीचाच खेळ आहे. ब्रम्हचर्य, संयम, उपासना यज्ञ केल्याने शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते स्मरणशक्ती चांगली होऊन बौद्धिक विकास होतो म्हणून नवरात्र हा शारीरिक व आध्यात्मिक शुद्धतेचा काळ आहे असे मानले जाते.

– संगीता कुलकर्णी, लेखिका /कवयित्री

What is your reaction?
1 :thumbsup:
1 :heart:
1 :joy:
1 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)