शाब्दिक चकमकीनंतर ईशांतची रेनशॉवर बाजी

रांची, दि. 20 – आज संपलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात कमालीची चुरस रंगली. अत्यंत रंगतदार अशा या सामन्यात तणावपूर्ण क्षणी भारतीय आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमकीही रंगल्या. त्यामुळे या मालिकेतील रंगत कायम राहिली. आज अखेरचा पाचवा दिवसही त्याला अपवाद ठरला नाही. भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा आणि ऑस्ट्रेलियाचा युवा सलामीवीर मॅट रेनशॉ यांच्यातील चकमक आजच्या खेळाचे वैशिष्ट्य ठरली. ईशांतने या चकमकीत बाजी मारली.
ईशांत रेनशॉला गोलंदाजी करीत असताना या द्वंद्वाला सुरुवात झाली. एक चेंडू टाकण्यासाठी ईशांतने धाव घेतली. तो चेंडू टाकणार, तोच अखेरच्या क्षणी साईट स्क्रीनजवळ काहीतरी हालचाल झाल्याचे दिसल्याने रेनशॉ क्रीजमधून अचानक बाजूला गेला. त्यामुळे चिडलेल्या ईशांतने हातातील चेंडू आपल्या फॉलो-थ्रूमध्ये जमिनीवर आपटला. तो चेंडू रेनशॉपासून दूर होता. परंतु त्यामुळे ठिणगी पडलीच होती.
रेनशॉने ईशांतला उद्देशून काहीतरी टिप्पणी केली. ईशांतने लगेचच त्याला प्रत्युत्तर दिले. दुसऱ्या बाजूला असलेल्या स्टीव्हन स्मिथनेही या वादात उडी घेतली. परिस्थिती चिघळणार असे दिसताच पंचांनी लगेचच विराट कोहलीला पाचारण करून हस्तक्षेप करण्याची विनंती केली. त्यानेही सर्वांशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणली. काही मिनिटांच्या व्यत्ययानंतर खेळ पुढे सुरू झाला. परंतु ईशांतने उसळत्या चेंडूने आपला संताप व्यक्‍त केला.
रेनशॉच्या थाय पॅडवर आदळलेल्या या चेंडूने उसळून हेल्मेटखालून रेनशॉच्या हनुवटीचा वेध घेतला. या दणक्‍यामुळे रेनशॉ निश्‍चितच विचलित झाला. अखेर ईशांतने एका अचूक चेंडूवर रेनशॉची खेळी संपुष्टात आणली. खोल टप्प्याच्या व यष्टीबाहेर पडलेल्या या चेंडूवर बचावात्मक फटका खेळण्यासाठी रेनशॉ यष्टीसमोर आला. परंतु अखेरच्या क्षणी आत घुसलेल्या या चेंडूने रेनशॉचा अंदाज साफ चुकविला आणि पंचांना पायचितचा निर्णय देण्यास वेळ लागला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)