शाडू मातीची मूर्ती घ्यायचीय पण…!

पिंपरी – सर्वत्र पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचा “डंका’ वाजवला जात आहे. मात्र, शाडूची माती आणि सेंद्रिय रंग सहज उपलब्ध होत नसल्याने, तसेच या मूर्ती बनविण्याची पद्धत अवघड असल्याने शाडू मातीच्या गणेश मूर्तींचे दर सामान्यांच्या आवाक्‍याबाहेर आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) च्या तुलनेत शाडू मातीच्या मूर्ती तिप्पट दराने विकल्या जात असल्याने पर्यावरण प्रेमी गणेशभक्‍तांचा भ्रमनिरास होत आहे.

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आल्याने पिंपरी-चिंचवड शहरात विविध ठिकाणी गणेश मूर्ती विक्रीसाठी स्टॉल लागले आहेत. शहरातील मुख्य भागात गणेश विक्रीचे मोठ्या प्रमाणावर स्टॉल लागले आहेत. पिंपरीतील संत तुकारामनगर येथे सर्वाधिक गणेश मूर्ती विक्री होत असते. हजारोंच्या संख्येत याठिकाणी “पीओपी’च्या गणेश मूर्ती विक्रीसाठी असताना त्यापैकी अवघ्या 20 टक्केच मूर्ती शाडू मातीच्या आहेत. पर्यावरण पूरक गणेशोत्सवाबद्दल मागील तीन ते चार वर्षांपासून जागृती वाढत आहे. यंदा शहरातील बहुसंख्य शाळा, विद्यालये तसेच विविध स्वयंसेवी संस्थांनी अगदी गृहिणींसाठी कार्यशाळा घेत शाडू मातीपासून गणेश मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण दिले. त्यामुळे जनजागृतीला हातभार लागला. शाडू मातीच्या मूर्तीला ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. मात्र, “बुकींग’साठी जाणारे ग्राहक मूर्तीचे दर ऐकून आवाक्‌ होतात.

“पीओपी’मध्ये विविध प्रकारच्या गणेश मूर्ती साकारता येतात. मात्र, ठराविकच आकारात शाडूच्या मूर्ती बनतात. विशेष म्हणजे “पीओपी’च्या दिवसाला सात ते आठ मूर्ती तयार होत असताना शाडू मातीच्या अवघ्या दोनच मूर्ती तयार करता येतात. शाडू माती व त्यासाठी वापरण्यात येणारे रंग सहजगत्या उपलब्ध होत नाहीत. त्याचे दरही जादा आहेत. “पीओपी’च्या तुलनेत या मूर्ती खूप जड असतात. मात्र, हाताळणीच्या बाबतीत तकलादू असतात. विक्रेत्यांची मागणी असूनही शाडूच्या मूर्ती पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे विक्रेत्यांना शाडूच्या मूर्तीखेरीज पर्याय राहत नाही. त्याचा परिणाम ग्राहकांवरही होत आहे. ते देखील “पीओपी’ला प्राधान्य देत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

“पीओपी’ मूर्तीचे प्रकार
दगडूशेठ, मंडई गणेश, कसबा, चिंचपोकळी, बालगणेश, लालबाग, कृष्णावतार, मोरपीस, गाय-वासरु, पितांबर, केसरी, देव, विठोबा, विष्णू अवतार, शंकर अवतार, सारस बाग, पुणेरी पगडी, मराठा पगडी अशाप्रकारच्या मूर्ती बाजारात विक्रेत्यांकडे विक्रीस आल्या आहेत. यामध्ये दगडूशेठ, केसरी, लालबागचा राजा, तुळशीबाग, मंडई, कसबा या मूर्तींना यावर्षी ग्राहकांची विशेष मागणी असल्याची माहिती गणेश मूर्ती विक्रेते श्रीकांत घाटे यांनी दिली.

असे आहेत मूर्तीचे दर
“पीओपी’च्या गणेश मूर्तीच्या किंमती 250 पासून ते 12 हजारापर्यंत आहेत. या मूर्ती सहा इंच पासून ते आठ फूट उंचीपर्यंत या मूर्ती मिळतात. 6 इंच मूर्ती अडीचशे, 1 फूट अकराशे, 2 फूट 2 हजार ते 3 हजार, 3 फूट 4 हजारापर्यंत, 4 फूट 8 हजार ते 12 हजारापर्यंत आहेत. दुसरीकडे शाडू मातीच्या मूर्ती बारा इंचापासून साधारणपणे दीड फुटापर्यंत उपलब्ध असतात. बारा इंच अकराशे रुपये, 1 फूट बावीसशे रुपये, दीड फूट चार हजार रुपये असे शाडू मातीच्या मूर्तीचे दर आहेत. केशरी गणेश व दगडूशेठ या दोन प्रकारातच शाडूच्या मूर्ती मिळतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)