‘शहीद मेजर कौस्तुभ राणे अमर रहे’

मुंबई: जम्मू-काश्मीर येथे घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावताना दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीमध्ये शहीद झालेल्या मेजर कौस्तुभ राणे यांना आज साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. आज सकाळी ९.३० वाजता शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या अंत्ययात्रेस ठाण्यातील मीरा रोड भागामधील शीतलनगर येथील त्यांच्या निवास्थानापासून सुरुवात झाली. परिसरातील नागरिकांनी शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या अंतिम दर्शनासाठी सकाळपासूनच गर्दी केली होती.
मेजर राणे यांचे पार्थिव शरीर तिरंग्यामध्ये लपेटून काचेच्या पेटीमध्ये ठेवण्यात आले होते. अंतयात्रेदरम्यान अनेक ठिकाणी मेजर राणे यांच्या पार्थिवावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. एका तरुण कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला वीरमरण आल्याने उपस्थितांमध्ये हळहळ व्यक्त केली जात होती. तब्ब्ल २ तासांनंतर अंतयात्रा स्मशानभूमीत पोहोचली. अफाट गर्दीमुळे लोकांनी झाडांवर, सभोवतालच्या इमारतीच्या छतांवर तसेच स्मशानभूमीच्या कठड्यांवर उभे राहून वीरमरण प्राप्त झालेल्या मेजर कौस्तुभ राणे यांना अखेरचा निरोप दिला.
मेजर कौस्तुभ राणे यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी लष्कराद्वारे बंदुकीच्या २१ फैरी झाडून शहीद मेजर कौस्तुभ राणे यांना मानवंदना अर्पण करण्यात आली. उपस्थितांद्वारे देखील ‘भारत माता की जय, शहीद मेजर कौस्तुभ राणे अमर रहे’च्या घोषणा देण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)