शहर स्वच्छतेने होणार नववर्षाचे स्वागत

कराड पालिकेकडून आराखडा तयार, स्वच्छता दूतांबरोबरच अधिकारी-पदाधिकाऱ्यांनी कसली कंबर

कराड – स्वच्छ सर्वेक्षण 2019 स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी कराड नगरपालिकेने कंबर कसली आहे. स्वच्छता दूतांबरोबरच अधिकारी-पदाधिकाऱ्यांना सहभागी करून घेत शहर स्वच्छतेचा नारा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. पालिकेने विविध उपक्रमांमध्येही स्वच्छतेला प्रथम स्थान देण्याचा प्रयत्न केला आहे. नुकत्याच झालेल्या विजय दिवस समारोहातही स्वच्छ दिंडी काढून स्वच्छतेचा प्रसार करण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दैनंदिन स्वच्छता मोहिमेबरोबरच आता नववर्षाचे औचित्य साधून आठ दिवस आठ ठिकाणी स्वच्छता करण्याचा आराखडा पालिकेच्या वतीने तयार करण्यात आला आहे. दि. 5 जानेवारीपर्यंत हा उपक्रम चालणार आहे. जानेवारी महिन्यात स्पर्धेसाठी मुल्यांकन होण्याची शक्‍यता गृहीत धरत पालिकेकडून युद्धपातळीवर स्वच्छता मोहिम राबविली जात आहे.

मंगळवार दि. 25 डिसेंबरपासून या मोहिमेला सुरूवात करण्यात आली आहे. या मोहिमेतंर्गत सुरू करण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेतून आतापर्यंत भाजी मंडई, बसस्थानक परिसर, सुपर मार्केट परिसर, कोयना पूल परिसर आदी ठिकाणी स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. शुक्रवारी कृष्णा पूल परिसरात स्वच्छता करून कचरा एकत्रित करण्यात आला.

कराड नगरपालिकेने गतवर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत उज्ज्वल यश संपादन केले असले तरी ज्या गोष्टीमध्ये आपण कमी पडलो याचा सारासार विचार करत व नव्या तंत्रज्ञानाची माहिती घेण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे दिसत आहे. स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत कराड नगरपालिकेने शहरातून संकलित करण्यात येत असल्येल्या कचऱ्याचे योग्य असे व्यवस्थापन केले आहे.

शहरासह वाढीव भागातून दररोज शंभर टक्‍के कचरा संकलनावर भर दिला जात आहे. आरोग्य सभापती प्रियांका यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रिनी टीमकडून दररोज सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. ओला व सुका कचरा याची माहिती नागरिकांना दिली जाते. कचऱ्याचे योग्य नियोजन व संकलन होण्यासाठी नवीन अठरा घंटागाड्या खरेदी केल्या आहेत. सध्या नवीन पंधरा व जुन्या घंटागाड्यांच्या माध्यमातून कचरा संकलन होत आहे. त्याचबरोबर ट्रॅक्‍टर, डंपर यासारखी वाहने पकडून 23 वाहनांमधून कचरा संकलनासाठी वापरली जात आहे. आता नववर्षाचे स्वच्छतेने स्वागत करण्यासाठी पालिकेने स्वच्छतेचाच आराखडा तयार केला आहे. पाच जानेवारीपर्यंत प्रत्येक दिवशी शहरात स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे.

याची पूर्णत: माहितीसाठी स्वच्छ क्रांती नावाच्या गृपची स्थापनाही केली आहे. कराड पालिकेच्यावतीने शहर स्वच्छ व सुंदर राहावे म्हणून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. स्वच्छतेसाठी कर्मचारी झटत असून नुकतीच नवीन कोयना पूल परिसरात कर्मचाऱ्यांनी स्वच्छता करून या आराखड्यास सुरूवातही केली. यावेळी चार ट्रॉली इतका कचरा एकत्रित करण्यात आला. मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्या आदेशानुसार पालिकेतील आरोग्य विभागासह इतर विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही यावेळी स्वच्छतेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

स्वच्छतेचे वेळापत्रक

-30 रोजी कार्वे नाका पाण्याची टाकी परिसर.
-31 रोजी छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई परिसर.
-1 रोजी बसस्थानक परिसर.
-2 रोजी सुपर मार्केट परिसर.
-3 रोजी नवीन कोयना पूल परिसर.
-4 रोजी कृष्णा पूल परिसर.
-5 रोजी कृष्णा घाट परिसर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)