शहर कॉंग्रेसमधील गटबाजीमुळे जनसंघर्ष यात्रा पाथर्डीला

File photo

शहर कॉंग्रेस कमिटीबाबत नेत्यांची “सूचक’ तयारी

निखील वारे यांची युवक रॅली

युवक कॉंग्रेसने जनसंघर्ष यात्रेच्यानिमित्ताने शहरात तीन हजार युवकांच्या दुचाकी रॅलीचे आयोजन केले आहे. यात्रा शहरात दुपारी तीन वाजता येणार आहे. युवक कॉंग्रेसतर्फे यात्रेचे स्वागत युवक कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष निखील वारे हे करतील. पत्रकार चौक- दिल्ली दरवाजा- नेप्ती नाका- आयुर्वेद हॉस्पिटल चौक- टिळकरोड मार्गे इंपिरिअल चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ जनसंघर्ष यात्रा व रॅली पोहचेल. तिथे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून पुढे मार्केट यार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ यात्रा पोहचणार आहे. डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर रॅली यात्रेबरोबर स्टेट बॅंक चौकात येऊन पाथर्डीकडे मार्गस्थ होईल.

नगर – कॉंग्रेसची जनसंघर्ष यात्रेच्या समारोपाला नगर शहर कॉंग्रेसची गटबाजी आडावी आली आहे. त्यामुळे पाथर्डी तालुक्‍यात यात्रेचा समारोप कार्यक्रम रंगण्याचे निश्‍चित झाले आहे. शहरातील या गटबाजीची वरिष्ठ नेत्यांनी चांगलीच दखल घेतली असून, भविष्यात त्याचे परिणाम चांगलेच पाहायला मिळतील, असे जाणकारांकडून समजत आहे.

-Ads-

जनसंघर्ष यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगर शहरातील कॉंग्रेस कमिटीच्या कार्यालयात आढावा बैठक घेतली होती. या बैठकीच्या एक दिवस अगोदर महात्मा गांधी जयंतीला कॉंग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांमधील वाद उफाळून आला. वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी भाषणात नेत्यांवरच शेरेबाजी करत शहर कॉंग्रेसच्या अपयशाचे खापर फोडले. काहींना हा प्रकार रुचला नाही. परिणामी पदाधिकारी एकमेकांना भिडले. याच पार्श्‍वभूमीवर जनसंघर्ष यात्रेच्या नियोजनाची बैठक झाली. गांधी जयंतीच्या अभिवादनानिमित्त झालेला हा प्रकार नेत्यांच्या कानावर गेला. काही पदाधिकाऱ्यांनी बंद केबिनमध्ये देखील तक्रारी केल्या. त्यावरून वरिष्ठ नेत्यांनी संबंधितांना चांगलेच सुनावले.

यावेळी झालेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांना जनसंघर्ष यात्रेचा समारोप नऊ तारखेला नगरमध्ये होत आहे, याची माहिती देण्यात आली. त्याचे नियोजन देखील सांगण्यात आले. नेत्यांनी शहरातील पदाधिकाऱ्यांवर कार्यकर्त्यांना एकत्र करण्याची जबाबदारी दिली. मात्र त्याची पूर्तता करण्यात एकाही पदाधिकाऱ्यांनी तयारी दर्शवली नाही. याला अपवाद फक्त युवक कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष निखील वारे यांचा! नेत्यांनी यावरून पदाधिकाऱ्यांवर चांगलाच संताप व्यक्त केला. नेत्यांनी शहर कॉंग्रेस कमिटीकडे पाठ फिरवत आणि पाथर्डीत जनसंघर्ष यात्रा घेण्याचे जवळजवळ निश्‍चित केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानुसार पाथर्डीतील कार्यकर्त्यांना तयारीच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

विळदला बैठकांवर बैठका!

जनसंघर्ष यात्रा यशस्वी होण्यासाठी डॉ. सुजय विखे पाटील स्वतः लक्ष घातले आहे. नगर शहर कॉंग्रेस कमिटीतील या गटबाजीकडे डॉ. विखे पाटील यांनी सध्या तरी दुर्लक्ष केले आहे. यात्रा यशस्वी होण्यासाठी डॉ. विखे पाटील हे विळद घाटातील त्यांच्या कार्यालयात बैठकांवर बैठका घेत आहेत. या बैठकांना शहरातील वरिष्ठ आणि जुन्या पदाधिकाऱ्यांना डावलण्यात आल्याचे समजते. त्यावरून ही यात्रा पाथर्डीलाच होणार असे संकेत मिळत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)