शहरावर पाणी कपातीचे “संकट

पिंपरी – गेली पंधरा दिवस शहरावर घोंघावणारे पाणी कपातीचे संकट काही दिवस पुढे ढकलले आहे. गटनेते व महापालिका पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत या प्रस्तावित दहा टक्के पाणी कपातीला महापौर राहुल जाधव यांच्यासह लोकप्रतिनिधींनी विरोध दर्शविला आहे. मात्र, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर हे गटनेत्यांच्या बैठकीत पाणी कपातीचे सादरीकरण करणार असून त्यानंतर दहा टक्के पाणी कपातीवर शिक्कामोर्तब केला जाणार आहे.

शहराची तहान भागविणाऱ्या पवना धरणात आज गतवर्षीपेक्षा 10 टक्के पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे भविष्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागू नये, त्यासाठी सध्याची पाणी पुरवठ्याची परिस्थिती आणि पाणी पुरवठा कपात करण्याबाबत बुधवारी (दि. 28) महापौर राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली गटनेते व अधिकाऱ्यांची बैठक झाली. आयुक्त हर्डीकर यांनी पत्रकारांना माहिती दिली. आयुक्त दालनात महापौर राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला सभागृह नेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, आयुक्त श्रावण हर्डीकर, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसेचे सचिन चिखले, अपक्षांचे कैलास बारणे, पाणी पुरवठा विभागाचे सह शहर अभियंता मकरंद निकम, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, विशाल कांबळे उपस्थित होते.

पवना धरणातून दिवसाला 480 एमएलडी ऐवजी 440 एमएलडीच पाणी उचलण्याचे सक्त आदेश पाटबंधारे विभागाने दिले आहेत. आज धरणात 79.93 टक्के पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा 30 जून 2019 पर्यंत पुरणार आहे. 15 जुलैपर्यंत शहराला पाणीपुरवठा करण्याच्या नियोजनात आठवड्यातून विभागानिहाय एक दिवस पाणीपुरवठा बंद करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. सध्या पाणी कपातीची आवश्‍यकता नसून पुढील काही दिवसात टप्प्या-टप्प्याने पाणी कपात करावीच लागणार असल्याचे सांगत आयुक्तांनी आगामी काळात पाणी कपातीचे संकेत दिले आहेत.

सध्या पाणी कपातीची आवश्‍यकता नाही. पाणी गळती रोखण्यावर भर दिला जाणार आहे. आजच्या बैठकीत पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती आणि कपातीसंदर्भात चर्चा झाल्याचे सांगत आयुक्त हर्डीकर म्हणाले, दररोज 440 एमएलडी पाणी उचलल्यास जुलै 2019 पर्यंत पाणी पुरु शकते. परंतु, पावसाने ओढ दिल्यास अडचण होईल. त्यामुळे पाणी कपात करणे आवश्‍यक आहे. अनधिकृत नळजोड मोहिम हाती घेतली आहे. अनधिकृत नळजोड, पाणीगळती रोखण्यावर भर दिला जाणार आहे. दोन वर्षांपूर्वी एका दिवसाआड पाणीपुरवठा केला होता. आजच्या चर्चेत पाणी कपातीबाबत दोन पर्याय पुढे आले आहेत. आठवड्यातून विभागानिहाय एक दिवस पाणीपुरवठा बंद करणे. त्यामुळे ज्या भागाला कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्या भागाला जादा दाबाने पाणीपुरवठा होईल. याशिवाय आठवड्यातून एक दिवस धरणातून पाणीच उचलायचे नाही. एक दिवस पाणी उचलण्याचे खंडीत करायचे. त्यामुळे दहा टक्के पाणीकपात होईल. या दोन्ही पर्यायाचा कृती आराखडा करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या आहेत. धरणातून दिवसाला 440 एमएलडी पाणी उचलूनच याचा आराखडा तयार केला जाईल, असेही आयुक्त हर्डीकर यांनी स्पष्ट केले.

पवना धरणातील पाणी साठा गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल 10 टक्‍क्‍यांनी कमी झाला आहे. जुलैपर्यंत पाणी पुरवायचे असले तर पाणी कपात करणे आवश्‍यक आहे. पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे. पावसाने ओढ दिल्यास पाण्याचा प्रश्‍न गंभीर होवू शकतो. त्यासाठी पाणी पुरवठ्याचे आठ दिवसात नियोजन करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहे. त्यानंतर बैठक घेऊन पाणी कपातीबाबतचा निर्णय घेण्यात येईल.
– एकनाथ पवार, सत्तारुढ पक्षनेते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)