शहराध्यक्ष, नाराज नगरसेवकांची दांडी

पिंपरी – महापालिकेच्या महापौरपदी आमदार महेश लांडगे गटाचे भाजप नगरसेवक राहुल जाधव तर उपमहापौरपदी शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप गटाचे सचिन चिंचवडे यांची निवड करण्यात आली. या दोन्ही पदांकरिता निवडणूक होत असताना महापौरपदाकरिता शत्रुघ्न काटे यांना डावलल्याने काटे, शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासह भाजपच्या अन्य दोन नगरसेवक या निवडीच्यावेळी अनुपस्थित राहिले. त्यामुळे भाजपातील हेवेदावे मात्र समोर आले आहेत.

पिंपरी महापौरपद अडीच वर्षांकरिता इतर मागासवर्गीय प्रवर्गाकरिता राखीव आहे. जवळपास 17 महिने हे पद भुषविल्यानंतर सत्ता समीकरणानुसार आमदार महेश लांडगे गटाच्या नितीन काळजे यांनी या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला. स्थायी समिती अध्यक्षपदाकरिता डावलल्याने लांडगे गटाचे भाजप नगरसेवक राहुल जाधव यांनी स्थायी समिती सदस्यत्वाचा तर महापौर नितीन काळजे यांनी महापौर पदाचा तडकफडकी राजीनामा दिला होता. मात्र, पक्षांतर्गत शिष्टाई यशस्वी झाल्याने या दोन्ही पदाधिकाऱ्यांचे राजनामे “पेल्यातले वादळ’ ठरले. त्यानुसार आमदार लांडगे यांनी राहुल जाधव यांना महापौरपदी संधी देण्याचा शब्द दिला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहर दौऱ्यानंतर महापौर नितीन काळजे आणि उपमहापौर शैलजा मोरे यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिल्यानंतर आमदार जगताप गटाच्या शत्रुघ्न काटे यांची महापौरपदाची प्रबळ राजकीय महत्वाकांक्षा होती. त्याकरिता त्यांनी जगताप गटाच्या नगरसेवकांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबइतील वषा निवासस्थानी भेट घेत, या पदाची इच्छा बोलून दाखविली होती. मात्र, यापूर्वीच शहरातील माळी समाज आणि खानदेशवासियांनी ही बाब प्रतिष्ठेची केल्याने या पदाचा तिढा वाढला होता.

दरम्यान, राहुल जाधव यांना स्थायी समिती अध्यक्षपदाकरिता डावलल्याने आमदार लांडगे यांनी महापौर पदाकरिता आपली राजकीय ताकद पणाला लावली होती. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरुन महापौरपदाकरिता जाधव यांना “ग्रीन सिग्नल’ मिळाला. त्यामुळे महापौरपदाकरिता भाजपकडून राहुल जाधव तर उपमहापौरपदाकरिता सचिन चिंचवडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने जगताप समर्थक, त्यातल्या त्यात डावलेले शत्रुघ्न काटे कमालीचे दुखावले.

पालकमंत्र्यांची सोयीस्कर अनुपस्थिती
या सर्व राजकीय घडामोडी घडत असताना, भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, शत्रुघ्न काटे यांनी या निवडणूक प्रक्रियेकडे पाठ फिरविली. राष्ट्रवादीने दोन्ही पदांकरिता उमेदवार दिल्याने, भाजपतील दुहीचा त्यांना फायदा मिळू नये, याकरिता दगा फटक्‍याची शक्‍यता लक्षात घेत, भाजपने या निवडणुकीकरिता “व्हीप’ बजावला होता. मात्र, दुखावलेले शत्रुघ्न काटे यांच्यासह भाजप नगरसेवक तुषार कामठे आणि रवी लांडे या निवडणुकीला अनुपस्थित राहिले. याशिवाय पालकमंत्री गिरीष बापट यांनी प्रकृती अस्वस्थ्याचे कारण देत शहरातील एका कार्यक्रमासह या निवडणूक कार्यक्रमाला देखील उपस्थित राहण्याचे टाळले. उमेदवारी अर्ज दाखल करताना देखील हे सर्व पदाधिकारी उपस्थित नव्हते, हे विशेष.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)