शहरात सात ठिकाणी आगीच्या घटना

पिंपरी – फटाकेमुक्त दिवाळीचे कितीही आवाहन केले जात असले तरी काही उत्साही नागरिकांना लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फटाके वाजविण्याचा मोह आवरला नाही. परिणामी शहरात विविध सात ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत.

दिवाळी सुरू होण्याच्या आधीपासून फटाकेमुक्त दिवाळीचे आवाहन सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे. एवढेच नव्हे तर शाळा-शाळांमधून दिवाळीत फटाके न वाजविण्याची शपथ देण्यात आली. महापालिकेच्या अग्निशमन दलानेही फटाके फोडताना घ्यावयाच्या काळजीविषयी शहरात जनजागृती केली होती. न्यायालयाने देखील यंदा फटाके वाजविण्यावर मर्यादा आणल्या आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत अनेकांनी फटाके फोडण्याची हौस भागवून घेतली. लक्ष्मी पूजन झाल्यानंतर फटाके फोडण्याचा उत्साह अनेकांना अनावर झाला. या अतिउत्साहामुळे या दिवशी सायंकाळी सात नंतर आगीच्या सात घटना शहरात घडल्या. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाला तारेवरची कसरत करावी लागली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पिंपरीतील गांधीनगर झोपडपट्टी येथे सायंकाळी 7 वाजून 25 मिनिटांनी डॉ. बेग कंपनीच्या कंपाऊंडमध्ये जळता फटाका पडल्याने कंपनीतील कच्चे मटेरियल तसेच गवताला आग लागून येथील पाला, पाचोळा जळाला. 7 वाजून 58 मिनिटांनी चिंचवडच्या केएसबी चौकातील सेहगल शोरुमजवळील डि 2 ब्लॉकमधील एका कंपनीतही आगीची घटना घडली. 8 वाजून 25 मिनिटांनी आलेल्या वर्दीनुसार पिंपळे निलख मधील विशालनगरमध्ये दोन घरांना आग लागले. 8 वाजून 55 मिनिटांनी कासारवाडीतील केशवनगर येथे एका इमारतीत जळते रॉकेट पडल्याने फ्लॅटला आग लागली. 8 वाजून 57 मिनिटांनी पिंपळे सौदागर येथील एका इमारतीवर पाचव्या मजल्यावर रॉकेट पडून आग लागली होती. याठिकाणी वाळत घातलेले कपडे जळाले. इंद्रायणीनगर भोसरी चारचाकी गाडी पेटली रात्री उशिरापर्यंत अग्निशमन दलाचे फोन खणखणत होते.

पाडव्याच्या दिवशी गुरुवारी (दि. 8) चिंचवड गावातील गांधीपेठ येथे पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीत दोन दुकाने, एक रिक्षा, दोन दुचाकी जळून खाक झाल्या. ही आग देखील फटाक्‍यामुळेच लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. संत तुकारामनगर येथील अग्निशामक मुख्यालयातून दोन बंब तसेच प्राधिकरण आणि रहाटणी उपकेंद्राचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी सव्वा तासात ही आग आटोक्‍यात आणली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र इमारतीमध्ये राहणाऱ्या एका रुग्णास धुरामुळे श्‍वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यास खासगी रुग्णालयात दाखल केले. अग्निशामक दलाचे अशोक कानडे, दिलीप गायकवाड, अमोल चिपळूणकर, विवेक खांदेवाड, लक्ष्मण होवाळे सुरेश पुंडे, सुभाष लांडे, बबुशा गवारी, प्रमोद जाधव, राजाराम चौरे, अमोल रांजणी, हिरामण बागडे, यांच्यासह 25 कर्मचाऱ्यांनी प्रयत्नांची पराकष्ठा करत ही आग विझविली.

फ्लाईंग लॅटर्नचा बेकायदा वापर
आग लागण्याच्या दुर्घटनांमुळे दिवाळीत आकाशात सोडण्यात येणाऱ्या दिव्यांवर (फ्लाईंग लॅटर्न) पोलीस आयुक्तांनी बंदी घातली असताना पिंपरी-चिंचवडकरांनी ती धुडकावून लावली. दिवाळी पहाट कार्यक्रमातही या दिव्यांचा वापर करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत फ्लाईंग लॅटर्न आकाशात झेपावताना दिसत होते. सोसायट्यांचे टेरेस, चौकाचौकात तरुणांच्या गटांकडून हे दिवे सोडले जात होते. नाशिकफाटा उड्डाणपूल, रावेत बास्केट ब्रीजवरुनही मोठ्या प्रमाणावर फ्लाईंग लॅटर्न सोडण्यात आले. विशेष म्हणजे फटाके विक्रेत्यांनी दुकान, स्टॉल्सच्या दर्शनी भागातच विक्रेत्यांनी हे दिवे लटकवून ठेवले होते. तरीही त्यावर कारवाई न झाल्याने नागरिकांनीही ही बंदी धुडकावून लावल्याचे पहायला मिळाले.

फटाक्‍यांमुळे लागणाऱ्या आगीच्या पार्श्‍वभूमीवर अग्निशमन दलाकडून यंदा दोन गाड्या पेट्रोलिंगसाठी ठेवल्या होत्या. सायंकाळी सहा ते अकरापर्यंत पेट्रोलिंग करण्यात आले. कुदळवाडी परिसरातील भंगार मालाच्या दुकानांना लागणाऱ्या आगीच्या घटनांमुळे दक्षता घेत याठिकाणी एक बंब तैनात करण्यात आला होता. पिंपरी चौकातही एक बंब अग्निशमन स्टॅंडबाय ठेवण्यात आला होता. आगीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न अग्निशमन दलाने केला.
– किरण गावडे, मुख्य अग्निशमन अधिकारी, महापालिका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)