राज्य उत्पादन शुल्कची राहुरी, पारनेर व आष्टी तालुका रोडवर कारवाई
नगर – महापालिका निवडणुकीसाठी दोन दिवसानंतर मतदान होत आहे. शहरात वेगवान घडामोडी होऊ लागल्या आहेत. अपप्रवृत्तांनी चाप लावता यावा यासाठी प्रशासनाने चांगली फिल्डिंग लावली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने देखील महसूलच्या खांद्याला खांदा लावून कारवाईला सुरू केली आहे. राज्यात विक्रीला प्रतिबंध असलेली तब्बल 24 लाख 41 हजार रुपयांची दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाने वाहनांसह जप्त केली आहे. राहुरी, पारनेर व आष्टी तालुक्यात ही कारवाई करण्यात आली.
नगर-मनमाड महामार्गावरील राहुरी येथील वांबोरी फाटा येथे 7 लाख 66 हजार 240 रुपयांची दमनची दारू आणि वाहन, तर पारनेरमधील कामरगाव आणि आष्टीतील कारखेल येथे 16 लाख 75 हजार 460 रुपयांची गोवा निर्मि त व राज्यात विक्रिला प्रतिबंध असलेली दारू व तीन वाहने जप्त करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वात मोठी ही कारवाई आहे.
बीड, दमन व नगरमधील तिघांना याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पराग नवलकर, उपअधीक्षक सी. पी. निकम यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई संजय सराफ, अण्णासाहेब बनकर, एस. एस. भोसले, सुरज कुसळे, प्रकाश अहिरराव, डी. सी. आवारे, जी. आर. चांदेकर यांच्यासह जवान कारवाईत सहभागी झाले होते.
मतदानापूर्वी शहरात “ड्राय-डे’महापालिका निवडणुकीसाठी 9 डिसेंबरला मतदान होत आहे. या मतदानापूर्वी शहरात “ड्राय-डे’ घोषित करण्यात आला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात बाहेरून येणाऱ्या मद्यसाठ्यावर आमचे बारकाईने लक्ष आहे. वेळेपेक्षा जास्त वेळ खुली असलेल्या 13 मद्यविक्री दुकानांचा परवाना निलंबित करण्याची कारवाई केली आहे. दिल्ली दरवाजा येथे मोठा मद्यसाठा जप्त केला आहे. मतदानासाठी दोन दिवस राहिले आहेत. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यांना शहरात येणाऱ्या अवैध मद्यसाठ्यावर थेट कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पराग नवलकर यांनी दिली.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा