शहरात भटक्‍या कुत्र्यांचा उच्छाद

पिंपरी – शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पुन्हा एकदा भटक्‍या कुत्र्यांची दहशत वाढू लागली आहे. कासारवाडीमध्ये भटक्‍या आणि रोगाटलेल्या कुत्र्यांनी काही जणांचा चावा घेतला तर थेरगावमध्ये तर पूर्ण वाढ झालेल्या आणि धिप्पाड कुत्र्यांनी नागरिकांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरवली आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून ही समस्या नागरिकांना सतावत आहे परंतु अद्यापही मनपा प्रशासन यावर तोडगा काढण्यास तयार दिसत नाही.

थेरगांव, दत्तनगर, पेपर मिल भागातून नागरिकांना रात्री जीव मुठीत घेऊन यावे-जावे लागत आहे. एक जरी कुत्रा भुंकला की संपूर्ण घोळकाच टोळधाड घातल्याप्रमाणे मागे लागतो आणि मग जीव वाचवत पळणाऱ्याची अक्षरश: त्रेधा तिरिपट उडते. मागील काही दिवसांपूर्वी अचानक सुमारे 15 ते 20 कुत्र्यांचा घोळका या भागात आल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे. कुत्र्याच्या भीतीने पालक मुलांना खेळण्यासाठी बाहेर पाठविण्यासही घाबरु लागले आहेत.

महापालिकेने कुत्री सोडल्याची चर्चा
ऐन सणासुदीच्या काळात भट्‌क्‍या कुत्र्यांनी हैदोस घातला असल्याने नागरिंकामध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली आहे. सध्या या परिसरात चर्चा आहे की महापालिकेच्या कर्मचारऱ्यांनी इतर भागातून पकडून ही कुत्री येथे आणून सोडली आहेत. तसेच या कुत्र्यांमुळे आजार होत असल्याची चर्चा ही सध्या या परिसरात जोरावर आहे. या बाबत दै. प्रभातने पशु वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मात्र या चर्चेत तथ्य नसल्याचे सांगितले आहे आणि जर कुणी येथे कुत्री आणून सोडली असतील तर चौकशी करून कारवाई करण्याचेही आश्‍वासन दिले आहे. सध्या विशिष्ट प्रकारच्या तापाने लहान मुले आजारी पडत असून कुत्राच्या अंगावरील गोचीडचा संसर्ग झाल्याने हा ताप होतो असे डॉक्‍टरांचे मत असल्याचे काही स्थानिक नागरिकांनी सांगितले. परंतु पशु वैद्यकीय अधिकारी म्हणतात की गोचीडमुळे ताप येत नसून जर कुत्र्यांच्या जास्त काळ संपर्कात राहिल्यास आजार होऊ शकतो. स्थानिक पातळीवर या कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. तसेच ही कुत्री या परिसरात कुणी सोडली याचीही चौकशी करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)