शहरात बसची संख्या वाढवा

पिंपरी – शहरातील बंद केलेले पीएमपीएमएलचे मार्ग पुन्हा सुरू करावेत, औद्योगिक परिसरात मिडी बस सुरू कराव्यात, नवीन मार्ग, बसची आवश्‍यकता पाहून बसची संख्या वाढवावी. त्याचबरोबर शहरात पीएमपीएमएलचे विभागीय कार्यालय सुरू करावे, अशा मागण्या नगरसेवकांनी पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालक नयना गुंढे यांच्याकडे केल्या.

पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालक नयना गुंढे यांनी बुधवारी (दि. 28) महापालिकेत बैठक घेतली. यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, स्थायी समितीचे सभापती ममता गायकवाड, पक्षनेते एकनाथपवार यांच्यासह स्थायी समिती सदस्य, नगरसेवक उपस्थित होते.

पीएमपीएमएलसाठी महापालिका 40 टक्के निधी देते. पीएमपीएमएलकडून पिंपरी-चिंचवडला सातत्याने दुजाभावाची वागणूक दिली जाते. पैसे देतो तर शहरवासियांचे पीएमपीएमएलकडून समाधान झाले पाहिजे. नाही तर यापुढे योग्य निधी अडविणार असल्याचेही सदस्यांनी सांगितले. शहरातील विविध मार्गावरील बंद केलेल्या बस पुन्हा सुरू कराव्यात, वाढती लोकसंख्या विचारात घेता नवीन मार्ग, बसची आवश्‍यकता बघून बसची संख्या वाढवा. औद्योगिक परिसरात मिडी बस सुरू कराव्यात. तसेच, शहरात पीएमपीएमएलचे विभागीय कार्यालय सुरू करून तेथे जनरल मॅनेजर दर्जाचा अधिकारी नेमावा. यासह महापालिका सभेला व स्थायी समितीच्या बैठकीला पीएमपीएमएलचा अधिकारी उपस्थित असावा, शहरातील पीएमपीएमएलच्या प्रश्‍नासंदर्भात पुढील महिन्यात ऑटो क्‍लस्टर सभागृहात बैठकीचे आयोजन करावे, अशीही मागणी नगरसेवकांनी केली.

त्या कर्मचाऱ्यांना सेवेत घ्या
पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालक नयना गुंढे एप्रिलमध्ये एक महिन्यासाठी ट्रेनिंगला जाणार आहेत. त्यामुळे पीएमपीएमएल अतिरिक्त पदभार पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे देण्याची मागणीही नगरसेवकांनी केली. 11 अपंग कर्मचाऱ्यांना पीएमपीएमएल सेवेत रुजू करून घ्या. पीएमपीएमएलचे तत्कालीन व्यवस्थापकी संचालक तुकाराम मुंढे यांनी 11 अपंग कर्मचाऱ्यांचे निलंबन केले होते. हे सर्व कर्मचारी न्यायालयात गेले होते. न्यायालयाने या सर्व कर्मचाऱ्यांना पीएमपीएमएल सेवेत रूजू करून घेण्याचे आदेश दिले आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना रूजू करून घेण्याची मागणी नगरसेवकांनी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)