शहरात प्लॅस्टिकविरोधी कारवाईला जोर

पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरात कारवाई : विक्रेत्यांना 40 हजारांचा दंड

पुणे – शहरातील प्लॅस्टिकविरोधी कारवाईने पुन्हा जोर धरला आहे. या अंतर्गत राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिका यांच्या वतीने पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात कारवाई करण्यात आली. यात प्लॅस्टिक विक्रेत्यांकडून 40 हजार रुपयांचा दंड आणि 150 किलोच्या प्लॅस्टिक कॅरीबॅग आणि दोन ट्रक थर्माकोल जप्त केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्लॅस्टिकबंदीअंतर्गत राज्यात 50 मायक्रॉनपेक्षा कमी असलेल्या प्लॅस्टिकचे उत्पादन, विक्री आणि वापर यावर बंदी घालण्यात आली आहे. याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या सहकार्याने बंदी असलेल्या प्लॅस्टिकची विक्री आणि उत्पादन करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई केली जात आहे. या कारवाई अंतर्गत आतापर्यंत पुणे विभागातील 100 कंपन्यांना बंदीचे आदेश देले आहेत. विक्रेत्यांवरील कारवाईसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे नुकतेच 14 पाहणी पथक तयार केले आहेत.

मंडळाचे प्रादेशिक अधिकारी दिलीप खेडकर यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी पथकातर्फे बालाजीनगर येथील के. के. मार्केट, कोंढवा परिसर तसेच पिंपरी-चिंचवड येथे कारवाई करण्यात आली. यात मंडळाचे पुणे झोन “एक’चे उपप्रादेशिक अधिकारी नितीन शिंदे, पिंपरी-चिंचवडचे उपप्रादेशिक अधिकरी किरण हसबनीस तसेच महापालिकेचे अधिकारी सहभागी झाले होते. या कारवाईत के. के. मार्केट येथील दुकांनामधून 150 किलोच्या प्लॅस्टिक पिशव्या, कोंढवा येथील एका गोडावूनमधून दोन ट्रक थर्माकोल आणि पिंपरी-चिंचवड येथून तीन किलोचे प्लॅस्टिक जप्त केले आहे.

“पर्यावरणाच्या दृष्टीने प्लॅस्टिकचा वापर अतिशय घातक आहे. त्यामुळेच मंडळातर्फे ही कारवाई केली जात आहे. मात्र, अजूनही शहरात छुप्या पद्धतीने प्लॅस्टिकची विक्री होत आहे. यातील बहुतांश माल हा परराज्यातून आलेला असतो. त्यामुळे नागरिकांनी याबाबत दक्षता राखावी. तसेच दैनंदिन जीवनात प्लॅस्टिकचा वापर होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.’

– दिलीप खेडकर, प्रादेशिक अधिकारी, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)