शहरात पीएमपी वाहतूक बंद…

पाच गाड्यांची तोडफोड : बिबवेवाडी परिसरात टायरमधील हवा सोडली
पुणे – शहरात सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर गुरूवारी पीएमपी वाहतूक बंद ठेवण्यात आली. प्रशासनाकडून सकाळी पाच वाजता नेहमीप्रमाणे वाहतूक सुरू करण्यात आली होती. मात्र, काही ठिकाणी जमावाने पीएमपीवर दगडफेक केल्याने सकाळी दहानंतर वाहतूक बंद करण्यात आली.

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या वतीने (पीएमपी) आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी हद्दीबाहेरील काही मार्ग बंद ठेवण्यात आले होते. मात्र, शहरांतर्गत वाहतूक सुरळीत सुरू राहणार असल्याचे पीएमपीकडून सांगण्यात आले. त्यानुसार पहाटे पाच वाजल्यापासून वाहतूक सुरू करण्यात आली होती. परंतु गोखले रोड, मार्केटयार्ड, लक्ष्मी रोड, बिबवेवाडी आणि हडपसर परिसरात काही बसेसवर दगडफेक झाल्याने शहरात सुरु असलेली वाहतूक बंद करण्यात आली होती.

दगडफेकीत पीएमपीच्या 5 बसेसची तोडफोड झाली असुन सुमारे 60 हजारांचे नुकसान झाले आहे. बिबवेवाडी परिसरात काही पीएमपी बसेसच्या टायरमधील हवा जमावाकडून सोडण्यात आल्याचे पीएमपीतील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. प्रशासनाकडून सकाळच्या सत्रात पीएमपीच्या 686 बसेस मार्गावर सोडण्यात आल्या होत्या. यानंतर एकही बस मार्गावर धावली नाही.

यामुळे पीएमपीला मोठा आर्थिक फटका बसला आहे. पीएमपीला दररोज सुमारे एक कोटी 40 लाखापर्यंत महसूल जमा होतो. मात्र, गुरूवारी आंदोलनामुळे पीएमपीला मोठा आर्थिक फटका बसला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)