नगरसेवक विजय वाटेगावकर यांची मागणी
कराड – पालिकेच्या परवानगीशिवाय शहरात कोठेही लावण्यात येणाऱ्या पोस्टर मालकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी नगरसेवक विजय वाटेगावकर यांनी केली आहे. एकीकडे पालिकेकडून शहरातील बॅनर काढून शहराचे विद्रुपीकरण रोखण्याचा प्रयत्न केला जात असतानाच काही पोस्टरप्रेमी मात्र शहराला विद्रुप करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
गत पंधरा दिवसांपूर्वी लायन्स क्लब व एनव्हायरो नेचर क्लब या सामाजिक संघटनांच्या सहकार्याने खिळेमुक्त झाड अभियान राबविण्यात आले होते. त्यानंतर पालिकेने शहरातील शुभेच्छा फलकही काढले आहेत. स्वच्छ व सुंदर शहर यासाठी पालिकेकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र काहींकडून त्याला खो घालण्याचा प्रयत्न केला जात आहे.
काही व्यावसायिक आपल्या व्यवसायाचे छोटे पोस्टर करुन पालिकेच्या परवानगी शिवाय कोठेही लावत आहेत.
त्याचबरोबर झाडांवर खिळे ठोकूनही काही ठिकाणी पोस्टर लावले जातात, नगरपालिकेच्या भिंतीवर तसेच कोल्हापूर नाका येथील स्व. यशवंतराव चव्हाण यांचे नाव असलेल्या स्वागत कमानीवरही पोस्टर लावलेले दिसत आहेत.
सध्या प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा सुरु आहे. त्यामुळे आपला व्यवसाय या स्पर्धेत टिकून रहावा, यासाठी नवनवीन योजना आखल्या जातात. त्या लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांना माहिती होण्यासाठी पोस्टर हे एक माध्यम आहे. हे जरी खरे असले तरी ते पोस्टर कोठे लावावेत, याची दक्षता घेणे गरजेचे असल्याचे वाटेगावकर यांनी सांगीतले.
सध्या शहरात कोठेही पोस्टर लावण्यात आले आहेत. अशा पोस्टर मालकांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा, झाडांची होणारी हानी टाळावी, अशी मागणी नगरसेवक वाटेगावकर यांनी मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्याकडे केली आहे. याबाबत मुख्याधिकारी डांगे यांनीही तात्काळ कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा