शहरातील “स्ट्रीट चिल्ड्रन’ शिक्षणापासून पूर्णतः दुर्लक्षित

88 टक्‍के मुले शाळेत न जाणारी : काहीही लिहिता-वाचता न येणारी 57 टक्‍के

पुणे – शिक्षण हक्‍क कायद्यानुसार 14 वर्षांपर्यंतच्या मुलांना प्राथमिक शालेय शिक्षण देणे सक्तीचे आहे. परंतु, शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात रस्त्यावर राहणारी मुले या बाबतीत पूर्णतः दुर्लक्षित आहेत. मनपा सर्वेक्षणानुसार सद्यस्थितीत यांतील शाळेत न जाणाऱ्या मुलांचे प्रमाण 88 टक्‍के आहे, तर काहीही लिहिता-वाचता न येणाऱ्या मुलांचे प्रमाण 57 टक्‍के इतके आहे. केवळ सात टक्‍के इतक्‍या मुलांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले आहे. क्वचित प्रमाणात मुले शाळेत जातात, त्यापैकी बहुतांश मुले सरकारी; तर काही मुले निमसरकारी शाळेत जातात.

शाळेत न जाण्याची कारणे : काहीवेळा मुलांना शाळेत जाण्याची इच्छा असून देखील पालकांनी पैसे कमावण्याचे सक्तीचे केल्याने जाता येत नाही. शाळेत दाखल होण्यासाठी मुलांकडे आधार कार्ड, जन्माचा दाखला इत्यादी आवश्‍यक कागदपत्रे नसल्याने त्यांना शाळेत दाखल करून घेता येत नाही. महाराष्ट्राच्या विविध सीमाभागांतून किंवा परराज्यांतून आलेले हे लोक असल्याने शिक्षण घ्यायचे झाल्यास भाषा हा या मुलांसाठी मोठा अडथळा ठरतो.

बरोबरीच्या मुलांकडून होणारा त्रास याला कंटाळून देखील काही मुलांनी शाळा सोडल्याचे सांगितले आहे. काही स्वयंसेवी संस्थांनी तात्पुरत्या स्वरुपात वस्त्यांच्या ठिकाणी, पुलाखाली आणि फुटपाथवर शाळा भरवून या मुलांना प्राथमिक शिक्षण देण्याचा प्रयत्न केला; परंतु या मुलांच्या शिक्षणासाठी शाश्‍वत व्यवस्था उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, असे या स्थितीतून पुढे आले आहे. “रेनबो फाउंडेशन’ आणि पुणे महापालिका यांनी संयुक्तपणे “रेनबो होम्स’ नावाचा प्रकल्प सुरू केला आहे.

या प्रकल्पामध्ये महापालिकेच्या शाळांतील रिकाम्या खोल्यांमध्ये या मुलांची राहण्याची व्यवस्था करून त्याच शाळांमध्ये त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केली आहे. सध्या पुण्यामध्ये अशाप्रकारचे पाच “रेनबो होम’ सुरू असून, त्यामधून 390 मुले शिक्षण घेत आहेत. यामध्ये मुलींची संख्या 300 पेक्षाही जास्त असून 86 मुलगे आहेत. पुण्यामध्ये असे आणखी वीस रेनबो होम सुरू करण्याचे प्रस्तावित असल्याचे “रेनबो फाउंडेशन’च्या व्यवस्थापक श्रीलता यांनी सांगितले.

शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी “बालरक्षक ग्रुप’ तयार केला आहे. या योजनेनुसार महापालिकेच्या प्रत्येक शाळेतील एका शिक्षकाची बालरक्षक म्हणून निवड केली आहे. हे शिक्षक शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल करून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करतील. मागील आठवड्यात त्यांचे ट्रेनिंग पूर्ण झाले असून, लवकरच प्रत्यक्षात काम चालू होईल. मनपा शाळेतील शिक्षक सचिन वाडकर यांनी शाळाबाह्य मुलांसाठी ऍप विकसित केले आहे. त्याचा यासाठी प्रभावीपणे वापर होईल. तसेच दिवस-रात्र निवारा प्रकल्पावर अंमलबजावणी सुरू झाल्यावर गरजेनुसार शाळेतील खोल्या उपलब्ध करून देता येतील.

– शिवाजी दौंडकर, शिक्षण विभाग अधिकारी, पुणे महानगरपालिका

समन्वयक – नितीन साके, पंकज कांबळे (प्रशिक्षणार्थी विद्यार्थी)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)