शहरातील 45 रस्त्यांवर “नो पार्किंग’

दोन दिवसांत महापालिका पोलिसांना देणार यादी

पुणे – महापालिकेने “नो हॉकर्स’ झोन म्हणून घोषीत केलेल्या शहरातील 45 रस्त्यांवर वाहतूक पोलिसांकडून “नो पार्किंग’ घोषीत केले जाण्याची शक्‍यता आहे. या रस्त्यांची यादी पालिकेकडून पुढील दोन दिवसांत पोलिसांना दिली जाणार आहे.

-Ads-

शहरातील खासगी वाहनांच्या संख्येने 37 लाखांचा आकडा गाठल्याने शहरातील वाहतूक समस्या गंभीर बनली आहे. त्यातच, रस्त्यावर झालेले अतिक्रमण, अनधिकृतपणे सुरू असलेले पार्किंग, जागोजागी पदपथ अडवून झालेली अतिक्रमणे यामुळ वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी स्मार्ट सिटी, महापालिका आणि पोलिसांनी संयुक्‍त उपाययोजना राबविण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. त्यानुसार, शहरात संयुक्त कारवाईही सुरू करण्यात आली आहे. मात्र, त्यानंतरही वाहतूक कोंडीची समस्या कायम असल्याने वेगवेगळ्या उपाययोजना करण्यासाठी ही बैठक बोलविण्यात आली होती. त्यात रस्त्यावरील बेवारस वाहने, पदपथावरील अतिक्रमणे, पार्किंगची जागा बंद करून सुरू करण्यात आलेले व्यवसाय, शहरातील रस्त्यांवर होणारे पार्किंगसह, कारवाईसाठी आवश्‍यक पोलीस बंदोबस्ताबाबत चर्चा करण्यात आली.

या बैठकीत वाहतूक कोंडीतून दिलासा मिळवायचा असल्यास महापालिकेने शहरात जे प्रमुख 45 रस्ते “नो हॉकर्स’ झोन म्हणून घोषीत केले आहेत. त्यावर “नो पार्किंग’ झोन करावेत, अशी सूचना महापालिकेकडून करण्यात आली. त्यामुळे कोंडीची समस्या सुटण्यास मोठी मदत होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यास पोलीस आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तसेच, महापालिकेने तातडीने ही रस्त्यांची यादी पोलिसांना द्यावी, त्यानंतर पुढील आठवड्यात त्यावर संयुक्त निर्णय घेऊन ही कारवाई करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. महापालिकेने ही यादी दिल्यानंतर पुढील आठवड्यात मंगळवारी ही बैठक होणार आहे.

हे आहेत प्रमुख रस्ते
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने जाहीर केलेल्या 45 प्रमुख रस्त्यांमध्ये सिंहगड रस्ता, बाजीराव रस्ता, सातारा रस्ता, नगर रस्ता, कर्वे रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, शिवाजी रस्ता, नेहरू रस्ता, जंगली महाराज रस्ता, फर्गसन रस्ता या रस्त्यांसह इतर आणखी काही रस्त्यांचा समावेश असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली. मात्र, ही यादी पोलिसांना देण्यात येणार असल्याने महापालिकेकडून केवळ सूचना करण्यात येणार असून अंतिम निर्णय पोलिसांचा असणार असल्याचेही सुत्रांनी स्पष्ट केले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)