शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांना “अच्छे दिन’!

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेने केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अभियानामध्ये यावर्षीही सहभाग घेतला आहे. त्यामुळे, महापालिकेने पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे सार्वजनिक स्वच्छतागृहांना “अच्छे दिन’ आले आहेत. केंद्रीय पथक भेट देण्याच्या धास्तीने स्वच्छतागृह चकाचक करण्यात आली आहेत. एवढेच नव्हे तर स्वच्छतागृहांसमोर रांगोळी रेखाटण्यात आली असून वृक्ष कुंड्या ठेवून सुशोभिकरण करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिक आवाक्‌ होत आहेत.

शहराने देशातील स्वच्छ शहराच्या यादीत अव्वल स्थान पटकावे यासाठी मागील काही दिवसांपासून महापालिकेकडून कसोशीने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यानुसार शहरातील प्रमुख रस्ते आणि स्वच्छतागृहे चकाचक करण्यात आली आहेत. 31 जानेवारीपर्यंत केंद्राचे पथक केव्हाही शहराच्या स्वच्छतेची पहाणी करणार असल्याने महापालिका स्वच्छतेच्या बाबतीत चांगलीच सतर्क झाली आहे. स्वच्छतेसंबंधी ऍप्लीकेशन तयार करुन नागरिकांच्या मदतीने शहरातील कचरा उचलण्याचा प्रयत्नही करण्यात आला. कचऱ्याचे व्यवस्थापन काटेकोरपणे करुन मुख्य रस्ते तसेच चौकात अस्वच्छता पसरु नये याची दक्षता घेतली जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिकेने बांधलेली सार्वजनिक स्वच्छतागृहेही चकाचक ठेवण्यात येत आहेत. अनेक स्वच्छतागृहामध्ये वॉश बेसिंग तसेच नॅपकीनची सुविधाही पुरवण्यात आली आहे. त्यामुळे कधी नव्हे ती पहिल्यांदा शहरातील स्वच्छतागृहे स्वच्छ आणि साफ दिसु लागली आहे. हे चित्र पाहून नागरिकांना आश्‍चर्याचा धक्‍का बसत आहे. महिलांच्या स्वच्छतागृहांमध्ये सॅनिटरी नॅपकीन व्हेंडींग मशीन लावण्यात आले आहेत. पाच रुपयाचे नाणे टाकल्यानंतर मशीनमधून सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध होत आहेत. महापालिकेने सर्वेक्षणापुरते नव्हे तर कायमस्वरुपी स्वच्छतेची दक्षता घ्यावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

स्वच्छ सर्व्हेक्षण 31 जानेवारीपर्यंत सुरु असणार आहे. महापालिका प्रशासनाकडून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी आवश्‍यक त्या सर्व उपाययोजना राबविल्या जात आहेत. शहरातील कचरा व्यवस्थापन बरोबरच स्वच्छतागृहाची साफसफाई करण्यात आली आहे. दोन दिवसांत केंद्राचे पथक केव्हाही पाहणी करु शकते. त्यामुळे नागरिकांनीही स्वच्छता राखून महापालिकेला सहकार्य करावे.
– अण्णा बोदाडे, सहाय्यक आयुक्‍त, महापालिका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)