पुणे – शहरातील वृक्षगणना अंतिम टप्प्यात

पुढील महिन्यात पूर्ण होणार काम

पुणे – शहरातील वृक्षगणनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ते सप्टेंबर-2018 अखेर संपणार आहे, अशी माहिती महापालिकेचे मुख्य उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांनी दिली. दरम्यान, सुमारे 33 लाख वृक्षांची गणना पूर्ण झाली असून पुढील दोन महिन्यांत आणखी 7 लाख वृक्षांची गणना अपेक्षित आहे, असेही घोरपडे म्हणाले. मागील दोन वर्षांपासून ही गणना सुरू आहे.

-Ads-

महापालिकेत शहरातील वृक्षांची संख्या 40 लाख गृहीत धरली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार, महापालिकेकडून मागील दोन वर्षांपासून शहरातील वृक्षांची ऑनलाईन गणना केली जात असून त्याचे काम “सार आयटी प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीकडून करून घेतले जात आहे. यासाठी सप्टेंबर 2018ची मुदत देण्यात आली आहे. त्यानुसार, कंपनीने सुमारे 33 लाख वृक्षांची मोजणी पूर्ण केली आहे. ही नोंदणी ऑनलाईन पद्धतीने सुरू असून हद्दीतील वृक्षांना “जिओ टॅगिंग’ केले जात आहे. त्यामुळे त्या वृक्षाची देखरेख ऑनलाईन केली जाऊ शकेल. यामध्ये वृक्षाचे वय, प्रजाती, उंची, लांबी, रुंदी, वैशिष्ट्ये आणि वृक्ष कोणत्या भागात आहे, याची नोंदणी केली जात आहे. यासाठी वनस्पतीशास्त्राचा अभ्यास करणारे 40 कर्मचारी नेमण्यात आले आहेत. ही गणना पूर्ण झाल्यानंतर ही सर्व माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.

लष्कर हद्दीतील सर्वेक्षण राहिले
महापालिका हद्दीत प्रामुख्याने नगर रस्ता आणि विश्रांतवाडीच्या काही भागात लष्कराची हद्द आहे. येथील वृक्षगणना अजून बाकी आहे. त्यात प्रामुख्याने नगर रस्त्यावरील काही भागाचा समावेश असून त्यात एअरफोर्स स्टेशन आणि इतर काही मिळकतींचा समावेश आहे. या सर्वेक्षणासाठी लष्कराकडे मोठ्या प्रमाणात अत्यावश्‍यक परवानगी मागण्यात आलेली आहे. याशिवाय, शहरातील काही मिळकती पत्र्याची सीमाभिंत घालून बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्या ठिकाणीही वृक्षगणनेच्या नोटीस लावण्यात आल्या आहेत. संबधित मिळकतींच्या मालकांचा शोध घेतला जात आहे. या सर्व प्रक्रियेस आणखी दोन महिने लागणार असून ही वृक्षगणना पूर्ण होणे शक्‍य असल्याचे घोरपडे म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)