शहरातील बसस्थानकांत तळीरामांचा सुळसुळाट

एसटी प्रशासनानेही तळीरामांपुढे टेकले हात : आवर घालावा कसा, पडला प्रश्‍न
नगर – उन्हाळ्याचा गर्दीचा हंगाम असल्याने शहरातील सर्व बसस्थानकांत प्रवाशांची मोठी वर्दळ आहे. त्यातच या बसस्थानकात मोठ्या प्रमाणावर दारुच्या नशेत असलेल्या तळीरामांचा सुळसुळाट झाला आहे. या तळीरामांमुळे प्रवासी वर्गाची कुचंबणा होत असून, या तळीरामांना वारंवार हाकलून लावले तरी पुन्हा बसस्थानकात येणाऱ्या या तळीरामांच्या पुढे एसटी कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी हात टेकले आहेत. या तळीरामांना नेमका कसा आवर घालावा, असा गहन प्रश्‍न एसटी प्रशासनाला पडला आहे.
सध्या सुट्टीचे व लग्नसराईचे दिवस असल्याने शहरातील माळीवाडा, स्वस्तिक, तारकपूर या बसस्थानकांवर येणाऱ्या प्रवासी संख्येत वाढ झालेली आहे. बसस्थानकात महिला वर्गाची लग्नसराईमुळे लक्षणीय गर्दी आहे. उन्हाची वाढती काहिली, बेफाम गर्दी यामुळे घामाघूम झालेला जीव प्रवासाच्या वाटेवर जेरीस आला आहे. अशा स्थितीत आपली गाडी फलाटावर येण्यापर्यंत प्रवाशांना बसस्थानकातील बाकावर बसने क्रमप्राप्त असते. वाढत्या गर्दीमुळे सध्या बसण्यासाठी बाकावर जागा मिळणे मुश्‍कील झाले आहे. अशातच दुपारच्या वेळी दारुच्या नशेत असलेल्या तळीरामांची बसस्थानकात संख्या वाढत असल्याचे निदर्शनाला येत आहे. बसस्थानकप्रमुख शिवाजी कांबळे व त्यांचे सहकारी या तळीरामांना बसस्थानकाबाहेर हुसकून लावत होते, तरी हे तळीराम बसस्थानकात वारंवार येत असल्याने त्यांना नेमका कसा आवर घालावा, असा एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांना प्रश्‍न पडला आहे.

तळीरामांनी शोधला बसस्थानकाचा आसरा
दारुमुळे होणारी उलघाल शांत करण्यासाठी रणरणत्या उन्हात या तळीरामांनी गारव्याची जागा म्हणून बसस्थानकाचा आसरा शोधला आहे. बसण्याच्या जागेवर पथारी टाकून पसरलेल्या या तळीरामांमुळे इतर प्रवासी वर्गाला ताटकळत उभे रहावे लागते. तसेच, दारुचा उग्र दर्प सहन करावा लागतो. या तळीरामांना आवर घालण्याचा प्रयत्न एसटीच्या कामगार-अधिकारी आणि चौकीतील पोलीस कर्मचाऱ्यांकडून होत आहे. आज रोजी हेच चित्र माळीवाडा बसस्थानकात आढळले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)