शहरातील पावसाचा जोर ओसरला

आतापर्यंत 278 मि.मि. पावसाची नोंद

प्रभात वृत्तसेवा

पुणे – शहरात मागील दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसाचा जोर रविवारी काहीशा कमी झाला होता. दिवसभरात पावसाच्या दोन ते तीन हल्या सरी पडल्या. दरम्यान, नेऋत्य मान्सूनने महाराष्ट्रात दमदार हजेरी केल्यानंतर मागील दीड महिन्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. पुणे शहरात 1 जून पासून आतापर्यंत 278.6 मिमी पावसाची नोंद झाली आहे. परंतू, शहरासह धरणक्षेत्रात पावसाची खरी गरज असून त्याठिकाणी पावसाचा जोर वाढला तर शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे भरतील. गेली दोन दिवस धरणक्षेत्रात पावसाच्या जोर वाढल्यामुळे एक ते दीड टीएमसी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

पुणे शहरात गेल्या 24 तासात 25 मीमी पावसाची नोंद झाली आहे. सलग दोन ते तीस दिवस वरूणराजा जोरदार बरसत आहे. आज दिवसभरात पावसाच्या हलक्‍या सरी पडल्या असून रात्री साठेआठ वाजेपर्यंत 3.2 मिमी पावसाची नोंद झाली. शहरात पुढील दोन दिवस पावसाच्या अधून-मधून सरी पडतील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. दरम्यान, शहरासह मध्य महाराष्ट्र, कोकण-गोवा याठिकाणी वरूणराजाची कृपादृष्टी झाली असली तरी मराठवाडा आणि विदर्भात मात्र अद्याप समाधानकारक पावसाला सुरवात झालेली नाही. आजही तेथील बळीराजा वरूणराजाने आतुरतेने वाट पाहत आहे. गेल्या 24 तासात कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. त्यामध्ये मुरवाड आणि पेठ येथे सर्वाधिक 170 मिमी पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ माथेरान आणि ओझरखेडा येथे 160, इगतपुरी येथे 150, हरसुल 140, महाबळेश्वर आणि , भिरा, भिवंडी, हर्णे, विक्रमगड येथे 130 मीमी पावसाची नोंद झाली.

घाटमाथ्यावरही पावसाचा जोर कायम असून शिरवाग येथे 270 मिमी पावसाची नोंद झाली. दावडी 190, ताम्हीणी 170, अम्बोणे येथे 160 मीमी पावसाची नोंद झाली. येत्या 48 तासात 18 व 19 जुलै रोजी कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. मराठवाड्यातही बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्यातील मध्यमहाराष्ट्रात आज पावसाचा जोर काहीशा ओसरला असून, दोन दिवस नाशिकमध्ये धुव्वाधार झालेल्या पावसाचाही जोर कमी झाला आहे. तर मुंबई येथील सांताक्रुज भागात सर्वाधिक 58 मिमी पावसाची नोंद झाली. तर पणजी येथे 34 मिमी पावसाची नोंद झाली. विदर्भ आणि मराठवाड्यातही काही ठिकाणी पाऊस झाला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)