शहरातील जर्जर रस्त्यांची पुन्हा खणाखणी

तीव्र आंदोलन करण्याचा सातारकरांचा सत्ताधाऱ्यांना अल्टीमेटम

सातारा –
लोकसभेच्या निवडणूक प्रचाराचा धुरळा साताऱ्यात आता रंग पकडू लागला आहे. तोपर्यंत सातारा शहरात आधीच जर्जर झालेल्या रस्त्यांची खणाखणी सुरू झाली आहे. आधीच ग्रेड सेपरेटरचा ताण आणि पुन्हा राजपथाला खणखणाट सुरू झाल्याने सातारकर पक्के वैतागले आहेत. रस्ते दुरुस्त न केल्यास तीव्र आंदोलन करु, असा इशारा देत सातारकरांनी पुन्हा सत्ताधाऱ्यांना राजकीय अल्टीमेटम दिला आहे.

निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर साताऱ्यातल्या नागरी समस्यांची मोठ्या प्रमाणात उजळणी होत आहे. ग्रेड सेपरेटरची सुविधा भविष्यात मिळणार असली तरी पोवई नाक्‍याला बसलेला आर्थिक फटका शहराची कोलमडलेली घंटेवारी आणि राजपथाची पुन्हा खणाखणी त्यामुळे साताऱ्यात पायाभूत सुविधाच्या नावाखाली सातारकरांना पिळवटण्याचे काम सुरू झाल्याची ओरड सुरू झाली आहे. मंगळवारी दुपारी घाईघाईने शाहू चौकातच जेसीबीने रस्त्याची खणखणी सुरू झाल्याने रस्त्यावर पाण्याचे पाट वाहू लागले. तातडीच्या पाईपलाईनच्या कामाचे त्रोटक स्पष्टीकरण ठेकेदाराने दिले मात्र त्यावेळी पालिकेचा कोणताच अभियंता तेथे उपस्थित नव्हता.

सात दिवस, चोवीस तास पाणी पुरवठा करण्याची घोषणा नगरपालिकेतील मनोमिलनाच्या नगराध्यक्षांनी दिली होती. आमदार आणि खासदार फंडातून यासाठी पैसेही देण्यात आले. पाण्याच्या टाक्‍यांची कामे जवळपास पूर्ण होत आली आहेत. मात्र, पाईपलाईन टाकण्यासाठी रस्त्यांची सुरु झालेली खोदाई अद्याप बंद न झाल्याने नागरिक त्रासले आहेत. पाईपलाईन टाकण्यासाठी खणलेल्या चरांमध्ये मोठी खडी टाकून ठेवली आहे.

तीन आठवड्यांहून अधिक काळ झाला तरी त्यावर डांबरीकरण झालेले नाही. या खडीमुळे अनेक लहान मोठे अपघात होत आहेत. निवडणूक आणि आचारसंहिता याची कारणे सांगून ही कामे तशीच राहिली होती. अखेरीस सातारकरांनी याबाबत आवाज उठवत आंदोलनाचा इशारा दिला आहे. खालच्या रस्त्यावर उकरलेल्या पाईपलाईनच्या जागेवरच नगरपालिकेचे अभियंता भाऊसाहेब पाटील यांना बोलावण्यात येउनही त्यांनी त्यांचा नवाबी थाट सोडला नाही. त्यापूर्वी मुख्याधिकारी शंकर गोरे यांनाही काम कधी पूर्ण करणार हे विचारण्यासाठी दूरध्वनी केले होते मात्र एक कारण सांगून दुसरीकडे पसार होण्याची त्यांची सवय गेलेली नाही.

एकीकडे शासकीय रुग्णालयासमोरील रस्त्याचे सुशोभीकरण होत असताना महत्त्वाच्या आणि अत्यंत रहदारी असणाऱ्या खालच्या रस्त्याकडे दुर्लक्ष का, असा प्रश्न निर्माण होत आहे. साताऱ्यात रस्त्यांची चाळ्ण झालेली असताना मुख्यमंत्र्यांनी सातारा शहरातील रस्त्यांसाठी दिलेल्या दीड कोटीचे मोठे कवित्व झाले. ज्या सोळा रस्त्यांना पैसे मिळाले त्यात प्रमुख राजपथाचाही समावेश होता त्यालाच पुन्हा खणण्यात आल्याने त्यात बीएसएनएलच्या सुध्दा लाईन खणल्या गेल्या. म्हणून शहरातील काही भागात अचानक लॅंडलाईन फोन डेड झाल्याच्या तक्रारी वाढल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)