शहरातील अवैध धंद्यांचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध धंद्यांमुळे गुन्हेगारीचा आलेख वाढत आहे. मात्र, या गुन्हेगारांना राजकीय पाठबळ मिळत असल्याचा खळबळजनक आरोप खासदार श्रीरंग बारणे यांनी केला आहे. थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केल्याने शहरातील अवैध धंद्यांचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

उद्योग नगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात अलिकडच्या काळात घडलेल्या अनेक गुन्हेगारी घटनांनी सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. खून, हाणामाऱ्या, टोळीयुद्धाचा भडका, वर्चस्ववादातून वाहनांची तोडफोड अशा अनेक घटनांना निरोप देत नवीन वर्ष मुळातच वाहनांच्या तोडफोडीने उजाडले. सलग तीन दिवस झालेल्या वाहनांच्या तोडफोडीमुळे पिंपरी-चिंचवडकर काहीसा भयभीत झाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

खासदार बारणे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात या गुन्हेगारी कारवायांबरोबरच या गुन्हेगारीला फोफावण्यास प्रत्यक्ष कारणीभूत ठरणाऱ्या अवैध धंद्यांकडे वेधले आहे. काही दिवसांपूर्वी संत तुकारामनगरसारख्या सुसंस्कृत भागात ऑनलाईन लॉटरीच्या आड चाललेल्या अवैध मटक्‍याची तक्रार एका सामाजिक कार्यकर्त्याने केल्यानंतर पिंपरी पोलिसांना हा अवैध प्रकार आपल्या हद्दीत सुरु असल्याचा साक्षात्कार झाला. त्यानंतर किरकोळ कारवाई दाखवत हे प्रकरण मिटवले. चिंचवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका मटक्‍याच्या अड्ड्यावरील रोकड पळवून नेली. मात्र, आता ही तक्रार नोंदवावी तरी कशी? असा प्रश्‍न पडल्याने केवळ काही रोख स्वरुपातील रक्कम अज्ञातांनी चोरुन नेल्याची तक्रार नोंदवावी लागली. भोसरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दापोडी येथील अवैध मटक्‍याच्या धंद्याची तक्रार केल्यानंतर भोसरी पोलिसांनी या मटक्‍याच्या अड्ड्यावर धाड टाकली. मात्र, पोलिसांच्या हातावर तुरी देऊन एक जण रोख रकमेसह पसार झाल्याने पोलिसांची चांगलीच नाचक्की झाली.

सध्या शहराच्या सर्वच भागांत ऑन लाईन लॉटरीच्या नावाखाली मटका, तीन पत्ती, जुगाराचे डाव रंगतात. मात्र पोलीस प्रशासनाच्या “सलोख्या’ च्या संबंधांमुळे हे धंदे बिनबोभाट सुरू आहेत. महामार्गालगतचे वाईन शॉप पुन्हा सुरु झाल्याने या दुकानांसमोरच ओपन बार संस्कृती पुन्हा फोफावली आहे. याशिवाय शहरातील उड्डाण पुलाखालील खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्या हातगाड्यांवर देखील दारु सहजपणे उपलब्ध होत आहे. या शिवाय गुटखाबंदी असुनही, दसपट किंमत मोजुन गुटख्याच्या पुड्या टपऱ्यांवर उपलब्ध आहेत.

मुख्यमंत्र्यांकडे दाद मागितली
गतवर्षीचा आढावा घेतला असता पोलिसांचा धाक न राहिल्यानेच गुन्हेगारी कृत्ये वाढल्याची बाब समोर आली आहे. खासदार बारणे यांनी यापूर्वी देखील पोलीस प्रशासनाला निवेदन देऊनही याकडे साफ दुर्लक्ष केल्याने त्यांनी शहरातील अवैध धंद्यांची थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तकार केल्याने पोलीस प्रशासन यावर कोणती भूमिका घेते, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)