शहरातील अल्पसंख्याक मूलभूत सोयींपासून दूरच : आबू आझमी यांचा आरोप 

 नगरमध्ये संघटनाबरोबरच पक्ष मजबूत करणार

नगर: शहरातील अल्पसंख्यांकांच्या वसाहती पाहिल्यास त्या मूलभूत सुविधांपासून अजून कोसो दूर आहे. भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या काळात ही परिस्थिती आणखी तीव्रतेने जाणवत आहे. मूलभूत सोयींपासून ते शैक्षणिक सुविधांपर्यंत ही परिस्थिती आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी समाजवादी पक्षाने पहिल्यांदाच नगर शहरात चार उमेदवार दिले आहेत. हे उमेदवार निवडून आल्यावर त्यांना मुंबई येथून ताकद देऊ, अशी प्रतिक्रिया समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार आबू आझमी यांनी दिली.

आबू आझमी म्हणाले, “नगर शहरात पक्षाचे संघटन आहे. ते काहीसे कमकूवत आहे. पण यापुढे हे संघटन मजबूत होण्यासाठी मदत करत राहू. पक्षाने यापूर्वी शहरात निवडणूक कधीही लढवली नाही. चांगले उच्च शिक्षण घेतलेले उमेदवार मिळाल्याने पक्षाने निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. या उमेदवारांना पक्षातर्फे सर्वोत्तोपरी निवडणुकीत मदत करणार आहोत.’ नगर शहरातील अल्पसंख्यांकाच्या वसाहती पाहिल्यास येथील परिस्थिती खूपच गंभीर आहे. मूलभूत सोयींचा अभाव आहे. देशात आणि राज्यात हीच परिस्थिती आहे. तरी देखील भारतीय जनता पक्षाचे सरकार “देश बदल रहा है, प्रगती कर रहा है,’ अशा घोषणा देत आहे.

नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेच्या अभियानाच्या जाहिरातीवर करोडो रुपयांचा चुराडा केला. या अभियानातील एक देखील शौचालय अल्पसंख्यांकाच्या वसाहतींमध्ये आलेले नाही. मुंबईसह महाराष्ट्र उघड्यावरील शौचमुक्त झाला असा फसवा दावा मुख्यमंत्री यांनी केला होता. तो फसवा दावा आम्हीच छायाचित्रांसह उघडकीस आणला. त्यानंतर त्यांनी घाईघाईने मुंबईच्या अल्पसंख्यांक भागात शौचालये मंजूर केले, असा दावा आबू आझमी यांनी यावेळी केला.

देशात सर्व काही रिलायन्स…

महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करत आहे. कामगार बेरोजगार होत आहे. उद्योजक नोटबंदीमुळे डबघाईला आला आहे. आशा परिस्थित रिलायन्स विमान बनवते. तिच कंपनी आता भाजीपाला विकणार आहे. सर्व काही रियालन्स करणार असले, तर शेतकऱ्यांनी काय करायचे? देशाची ही प्रगती एका ठिकाणी केंद्रीत होत आहे, असा टोला यावेळी आबू आझमी यांना लगावला.

मोदींनी देशाचे दुश्‍मन वाढविले

नरेंद्र मोदी यांचे परराष्ट्र धोरण फसले आहे. चीनने त्यावर कुरघोडी केली आहे. पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, चीनसह लगतच्या देशाने भारताशी व्यापाराबाबत संपर्क तोडला आहे. चीन या देशांना रसद पुरवित आहे. देशासाठी ही धोक्‍याची घंटा आहे. नरेंद्र मोदी यांना त्यांच्या परराष्ट्र धोरण फसले आहे. त्यांनी देशाच्या दुश्‍मनांमध्ये वाढ केली आहे, असेही आबू आझमी यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)