शहराच्या विकासास चालना देण्यासाठी “नगर नवनिर्माण अभियान’ची स्थापना

नगर, दि. 19 (प्रतिनिधी) – ऐतिहासिक पार्श्‍वभूमी असलेल्या अहमदनगर शहराचे महानगरात रूपांतर करून सर्वांगीण विकास साधण्यासाठी, तसेच थांबलेल्या विकासास चालना देण्यासाठी नगरमधील विविध क्षेत्रातील काही सृजनशील नागरिकांनी एकत्र येऊन “नगर नवनिर्माण अभियाना’ची स्थापना केली आहे.
या अभियानामध्ये एन. डी. कुलकर्णी, वसंत लोढा, डॉ. गिरीश कुलकर्णी, गजानन लांडगे, के. के. शेट्टी, डॉ. एस. एस. दीपक, सुहास मुळे, मौलाना अन्वर नदवी, संजय चोपडा, अर्शद शेख, शाकीर शेख, शिरीष लहाडे, जयंत येलूलकर, बाळासाहेब भुजबळ, डॉ. अविनाश मोरे, ऍड. शिवाजी कराळे, हरजितसिंग वधवा, सुनील पंडित, मिलिंद गंधे, शिवाजी लोंढे, प्रा. संजय सातपुते, हेमंत दंडवते, सलीम देसाई, डॉ. जगदीश भराडिया, प्रा. मच्छिंद्र मालुंजकर, अंजली देवकर, अशोक असेरी, सुरेश क्षीरसागर, कमलाकर पाटोळे, सोमनाथ चिंतामणी, राजकुमार जोशी, कैलास दळवी, मुन्ना चमडेवाला, भगवान कुलकर्णी, शाकीर सय्यद, सतीश लोटके, अमोल बागूल, उमेश साठे, उमेश बोरा, उदय अनभुले, आदींचा समावेश करण्यात आला आहे.
या अभियानाबद्दल अधिक माहिती देताना निमंत्रक एन. डी. कुलकर्णी यांनी सांगितले की, नगर शहराची स्थापना होऊन शेकडो वर्षे झाली आहेत तरी शहर अजून आहे त्याच स्थितीत आहे. नगर शहराच्या थांबलेल्या विकासास चालना देण्यासाठी सतत संबंधित व्यक्‍तींकडे, अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करणे या उद्देशाने या अभियानाची स्थापना करण्यात आली आहे. सर्वसामान्य जनतेला बरोबर घेऊन नागरी चळवळ उभारणे, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्‍त, पोलीस अधीक्षक, पालकमंत्र्यांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत विकास कामांसाठी पाठपुरवठा करणे; प्रसंगी आंदोलनही करणे अशी विधायक कामे या अभियानाच्या माध्यमातून करणार आहोत. यासाठी नगरमधील विविध क्षेत्रातील नागरिकांची टीम उभी केली आहे. आपल्या नगर शहराच्या विकासाकरिता सक्षम पाऊल उचलून काही तरी करण्याची वेळ आता आली आहे. यासाठी सर्व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे या अभियानात सहभागी होऊन आम्हाला साथ द्यावी.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते वसंत लोढा म्हणाले, “”नगरमध्ये महापालिका स्थापन झाल्यानंतर शहराचे महानगर होईल असे वाटले होते. मात्र, परिस्थिती उलटी आहे. या दूरवस्थेतून शहराला बाहेर काढण्यासाठी नगर नवनिर्माण अभियानास सुरुवात करून शहरातील सर्व जनतेला बरोबर घेऊन प्रभावीपणे हे अभियान राबविणार आहोत. नगर शहराचा विकास फक्‍त कागदावरच आहे. प्रशासनावर व लोकप्रतिनिधींकडे नागरिकांचा दबाव गट निर्माण करून नगर शहराच्या विकासाकरिता उपाययोजना राबविण्यासाठी सतत पाठपुरवठा करणार आहोत.”
यावेळी डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी सांगितले की, संपूर्ण जगातील प्रत्येक मोठ्या क्रांतीमागे एक ध्येयवेडा व्यक्‍तीच होता. भारतातही अशा ध्येयवेड्या व्यक्‍ती होऊन गेल्या आहेत. त्यांचीच प्रेरणा घेऊन आपणही नगर शहराच्या विकासाकरिता ध्येयवेडे होऊ व कामाला लागू. जनतेचा नक्‍कीच पाठिंबा व सहकार्य आपल्याला मिळेल.
यावेळी झालेल्या बैठकीत नवनिर्माण अभियानाची सुरुवात काही प्रमुख कामांनी करण्यात येणार असल्याचे ठरले आहे. यात सर्वप्रथम नगरच्या महापालिकेच्या आयुक्‍तपदी एक सक्षम व कडक शिस्तीचा अधिकारी नेमण्यात यावा यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच, सांस्कृतिक चळवळीला चालना देण्यासाठी रंगभवन सभागृह व कॉन्सिल हॉलच्या पुनर्उभारणीसाठी पाठपुरावा, शहरातील उद्यानांचे सुशोभिकरण, शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी वाहतुकीचा आराखडा तयार करणे, तसेच महापालिकेकडे शहरातील महामार्ग हस्तांतरणास तीव्र विरोध करणे, आदी प्रमुख कामे सुरू करण्यासाठी नवनिर्माण अभियानाचे सर्व सदस्य कामाला लागले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)