शहराचा परिपूर्ण विकास साधला जाणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : कर्वे रस्त्यावरील दुमजली उड्डाणपुलाचे भुमीपूजन

कोथरूड – पुण्यात जे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत, त्यामधून पुणे शहराचा परिपूर्ण विकास साधला जाणार आहे. पुण्यातील दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सार्वजनिक वाहतूक सक्षम होणे गरजेचे असून त्यासाठी मेट्रो हा महत्त्वाचा पर्याय ठरणार आहे. कर्वे रस्त्यावर होणारा हा दुमजली उड्डाण पूल हा पथदर्शी ठरणार असून तो पाहण्यासाठी बाहेरून लोक येतील, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

महानगरपालिका आणि महामेट्रो यांच्या संयुक्त विद्यमाने कर्वे रस्त्यावर साकारल्या जाणाऱ्या दुमजली उड्डाणपुलाचे भुमीपूजन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे, आमदार मेधा कुलकर्णी, माधुरी मिसाळ, विजय काळे, जगदीश मुळीक, भीमराव तापकीर, या उड्डाणपुलासाठी पाठपुरावा करून अर्थसंकल्पात निधी मंजूर करून घेणारे नगरसेवक आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, कोथरूड मतदारसंघातील भाजपचे सर्व नगरसेवक, नगरसेविका आदी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले की, पुणे मेट्रोने पहिल्याच वर्षात 25 टक्‍के काम पूर्ण केले आहे आणि ते कौतुकास्पद आहे. पुण्यात या अगोदर चुकीचे उड्डाण बांधण्यात आल्याचे आपण पाहिले आहे. परंतु, भाजपची सत्ता आल्यापासून नियोजनबद्ध पद्धतीने उड्डाण पुलांची कामे सुरू आहेत. सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी इलेक्‍ट्रिक बसेस लवकरच सुरू करणार आहोत. स्वारगेट येथे मेट्रो, बस व एसटी अशा सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था एकाच ठिकाणी नागरिकांना उपलब्ध होतील, असे सुसज्ज ट्रान्सपोर्ट हब तयार केले जाणार आहे. शहरातील वाहणाऱ्या नद्यांसाठीही केंद्राचा निधी मंजूर झाला असून त्यामाध्यामातून नद्या सुशोभित आणि निर्मळ करण्यात येणार आहेत.

पालकमंत्री बापट म्हणाले की, अगोदर जे सत्तेत होते त्यांनी केवळ जाहीरनामे प्रसिद्ध करून आश्वासने दिली; पण ती कधीच पाळली नाहीत. भाजपने मात्र जाहिरनाम्यात दिलेली सर्व आश्वासने वेळेत पूर्ण करत असून त्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी प्रयत्न करत आहेत. पुण्यातील मेट्रोचे काम अधिक गतीने व्हायला हवे, त्यासाठी समन्वय राखणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

मुरलीधर मोहोळ म्हणाले की, कोथरूड कर्वेनगर वारजेकडे जाण्यासाठी कर्वे रस्ता हा एकमेव मार्ग असून त्यावर प्रंचड वाहतूकीचा ताण असतो. या रस्त्यावरील वाहतूक कोंडीचे मुख्य ठिकाण असणाऱ्या नळस्टॉप चौकात तासाला 35 हजार वाहणे ये-जा करत असतात. त्यामुळे येथील वाहतुकीचा प्रश्न सोडवणे गरजेचे होते. या होणाऱ्या दुमजली उड्डाण पुलामुळे कर्वे रस्त्यावरील वाहतुकीमुळे कोंडलेला श्वास मोकळा होणार आहे. आता कोथरुड हे उपनगर म्हणून ओळखले जाते; पण भविष्यात ते महानगर म्हणून ओळखले जावे, यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)