शहरांत 48 तर ग्रामीण भागात 72 तासांत वीजबील

महावितरणची नवी व्यवस्था; छपाई व वितरणाची केंद्रीय व्यवस्था
नगर – राज्यातील अडीच कोटीपेक्षा अधिक वीज ग्राहकांना वेळेत व अचूक वीजबील मिळावे तसेच ग्राहकांना वीजबील भरण्यासाठी अधिक कालावधी मिळावा, यासाठी महावितरणच्यावतीने वीजबिलांची छपाई व वितरण केंद्रीयस्तरावर करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात झाली आहे.
देशातील वीज वितरण क्षेत्रात अशा पद्धतीचा नावीन्यपूर्ण प्रयोग प्रथमच होत असून यामुळे ग्राहकसेवा गुणवत्तेत मोठी वाढ होईल. जास्तीत जास्त ग्राहकांना प्रॉम्ट पेंमेंट डिस्कॉऊंटचा लाभ घेता येईल. महावितरणच्या सध्याच्या बिलिंग व्यवस्थेतील प्रक्रियेमुळे वीजबिलांची छपाई व ते ग्राहकांपर्यन्त पोहोचण्यासाठी साधारणत: 7 ते 8 दिवसांचा अवधी लागतो. ग्राहकांना वेळेत वीजबील न मिळाल्यामुळे त्वरीत देयक प्रदान दिनांक अंतर्गत मिळणारी सूट (प्रॉम्टपेमेंट डिस्काऊंट) मिळण्यास ग्राहकांना अडचणी येत होत्या. याशिवाय वेगवेगळ्या एजन्सींद्वारे वीजबिलांची छपाई व वितरण होत असल्यामुळे त्यावर संनियंत्रण ठेवणे कठीण जात होते.
या सर्व बाबींवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी महावितरणच्यावतीने केंद्रीय पद्धतीने वीजबिलाची छपाई व वितरण करण्यात येणार आहे. मोबाईल मीटर रिडिंग पद्धतीमुळे प्रत्यक्षवेळी (रिअल टाईम) मीटरवाचन तसेच चेक रिडिंग उपलब्ध होत आहे. त्यामुळे या व्यवस्थेत जलद व दैनंदिन पद्धतीने बिलावरची संपूर्ण प्रक्रिया करण्यात येणार आहे. या प्रक्रियेमुळे ग्राहकांना जास्तीत जास्त अचूक वीजदेयक मिळेल तसेच त्यांना वीजदेयके भरण्यासाठी अधिकचा कालावधी मिळाल्यामुळे वीजदेयक भरणा केंद्रातील रांगा कमी होतील व देयक भरणे अधिक सोयीचे होईल. मुख्यालयातील सर्व्हरवर बील तयार करण्यात येणार असून हे बील परिमंडलस्तरावर वीजबील वितरणासाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या एजन्सीकडे 24 तासांत पाठविण्यात येईल. त्यानंतर या एजन्सीकडून शहरी भागात 48 तासांत आणि ग्रामीण भागात 72 तासांत वीजबील वितरीत करण्यात येईल. दिलेल्या मुदतीत ग्राहकांना वीजबील न देणाऱ्या एजन्सींना दंड आकरण्यात येईल. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांना वेळेत वीजबील मिळून प्रॉम्ट पेंमेंट डिस्काऊंटचा लाभ घेता येईल.
या नावीन्यपूर्ण प्रक्रियेमुळे ग्राहकसेवा गुणवत्तेत मोठी वाढ, वसुली कार्यक्षमतेत वाढ व थकबाकी तसेच वाणिज्यिक हानीत घट, उपलब्ध मनुष्यबळाचे प्रभावी नियोजन, बिलींग, छपाई व वितरण खर्चात मोठी बचत, संपूर्ण व्यवस्थेवर केंद्रीयस्तरावरून नियंत्रण, बिलींग तक्रारीच्या प्रमाणात घट व संपूर्ण बिलींग व्यवस्थेवर माहिती तंत्रज्ञानाच्या साह्याने संनियंत्रण इत्यादी लाभ होणार असून त्या सर्वांचा फायदा ग्राहकांना होईल.

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)