शहरवासियांच्या जीवाशी खेळतेय “पीएमपी’

“व्हील’ला चारच बोल्ट : प्रशासनाचा बेजबाबदारपणा

पिंपरी – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) प्रशासनाचा बेजबाबदारपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. बसच्या चाकाच्या आठ ऐवजी चार बोल्टवरच पीएमपीचे व्हील सुसाट धावत असल्याचा धक्कादायक प्रकार एका प्रवाशाने उघडकीस आणला आहे.

चिंचवड येथील बीआरटीच्या मार्गावर धावणारी नेहरुनगर आगाराची एम. एच.12, एच. बी. 1915 क्रमांकाची बस चक्क व्हीलला 4 बोल्ट घेवून सुसाट धावताना दिसली. व्हीलला एकूण आठ बोल्ट असतात. मात्र आगार प्रशासनाचा बेजबाबदारपणा इतका की एवढी गंभीर बाब असून सुद्धा याची दखल घेतली गेली नाही. यामुळे पीएमपी बसच्या सुरक्षेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे. हे सर्व चित्र एका सतर्क नागरिकाने आपल्या मोबाईलमध्ये टिपले. प्रवासी मंचाच्या सदस्याने वरिष्ठ पातळीवर याबाबत तक्रार केली. यामुळे हा सर्व प्रकार समोर आला. यामुळे डोळे झाकून पीएमपीने प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पीएमपीएमएलने तत्काळ बसचे व्हील दुरुस्त केले. मात्र, हा बेजबाबदारपणा प्रवाशांच्या जीवावर बेतला असता तर याला कोण जबाबदार, असा सवाल उपस्थित होत आहे.

आगार प्रमुख म्हणून प्रशासकीय जबाबदारी सर्व माझ्यावर आहे. मात्र, बसच्या दुरुस्तीकडे संबंधित कार्यशाळा प्रमुख, कर्मचारी व चालकाचेही लक्ष असायला हवे. या चुकीसाठी जो कुणी जबाबदार असेल त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.
– राजेश रुपनवर, आगार प्रमुख, नेहरुनगर, पिंपरी.


आगारात दररोज 15 गाड्यांची तपासणी केली जाते, त्यासाठी आगारात कर्मचारी नेमले आहेत. गाडी धावत असताना असे अनेकदा प्रकार होतात, चाकाचे बोल्ट पडले नसून व्हीलचे पडले होते. गाडी कधी-कधी चुकीच्या पद्धतीने चालवल्यास असे प्रकार होतात. तरी सुद्धा जो कुणी यास जबाबदार असेल त्यावर कारवाई होईल.
– विजय रांजणे, कार्यशाळा प्रमुख, नेहरुनगर, पिंपरी.


पीएमपी कडून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरु आहे. यास आगार प्रमुख आणि कार्यशाळा प्रमुख जबाबदार आहेत. गाडी आगाराबाहेर पडत असताना सर्व तपासणी करणे गरजेचे असते. मात्र, येथे सपशेल दुर्लक्ष झाले आहे. आगार प्रमुख व कार्यशाळा प्रमुख यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी.
– संजय शितोळे, सचिव, प्रवासी मंच पुणे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
36 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)