शस्त्रक्रियेनंतर महिला रुग्ण झोपल्या जमिनीवर

राजगुरूनगरात प्राथमिक आरोग्य केंद्र सोयी-सुविधाच नाही

राजगुरूनगर- येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महिलांची बिन टाक्‍याची शस्त्रक्रिया केली जात आहे. मात्र, दवाखान्याची जागा आणि सोयी सुविधा मिळत नसल्याने या रुग्णांचे मोठे हाल होत आहे. शस्त्रक्रिया केलेल्या महिलांना रात्रभर जमिनीवर झोपावे लागत आहे. राजगुरूनगर शहर आणि परिसरातील रुग्णांची संख्या लक्षात घेता येथे नव्याने दवाखान्यासाठी इमारत होणे अपेक्षित असताना त्याकडे लोकप्रतिनिधीनी मोठे दुर्लक्ष केले आहे.

तहसीलदार कचेरीच्या जवळ 1980 च्या दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्राची छोटीशी इमारत बांधण्यात आली आहे. ही इमारत आता जुनी झाल्याने ती जीर्ण झाली आहे. इमारतीवर पिंपळाची झाडे वाढल्याने त्याच्या मुळ्या दवाखान्याच्या भिंतीमध्ये गेल्या आहेत. भिंतीना व इमारतीच्या स्लॅबमध्ये त्या घुसल्याने दवाखाना कधी कोसळेल सांगता येत नाही. राजगुरूनगर शहरात सुसज्ज असे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची गरज असताना लोकप्रतिनिधी राजकारण करीत आहेत. या अति महत्त्वाच्या प्रश्‍नाकडे त्यांचे व प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने हा प्रश्‍न अजूनही सुटलेला नाही.

 • आरोग्य केंद्र केव्हाही कोसळण्याची भीती
  राजगुरूनगर शहरात हे आरोग्य केंद्र असल्याने येथे येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यात महिला रुग्णांची संख्या मोठी आहे मात्र, या आरोग्य केंद्राची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. हे आरोग्य केंद्रच आजारी पडले असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा आणि जीविताचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या आरोग्य केंद्राची इमारत केव्हाही कोसळण्याची भीती असून याकडे जिल्हा आरोग्य प्रशासन स्थानिक पुढारी यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. तालुक्‍यात दहा आरोग्य केंद्रापैकी तालुक्‍याची राजधानी असलेल्या राजगुरुनगर शहरात रुग्णालयाची इमारत आजारी पडली आहे. ना तिला दुरुस्तीचे सलाईन लावले जात ना तिची दुरुस्ती करण्यासाठी ऑपरेशन. शहरातील रुग्णांची लक्षणीय संख्या असताना त्यांच्या आरोग्याशी जिल्हा परिषद आणि लोकप्रतिनिधीनी खेळ सुरु केला आहे.
 • राजगुरुनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज 150 ते 200च्या आसपास रुग्ण उपचारासाठी येत असतात. या प्राथमिक आरोग्य केंद्रात आजारी रुग्णांना बसायला जागा नाही. उपचारासाठी स्वतंत्र रुम नसल्याने पुरुष आणि महिलांवर एकत्र उपचार करावे लागतात. डिलीव्हरी झालेल्या महिलांना कोंदट अंधाऱ्या रुममध्ये रहावे लागते. शौचालयाचा वापर पुरुष महिलांना एकत्र करावा लागतोर पाण्याची सुविधा नाही. महिलांची कुंचबणा होत असते. पार्किंगची व्यवस्था नसल्याने गाड्या रस्यावर लावाव्या लागतात. कर्मचाऱ्यांना दररोजच्या कामकाजाला पुरेशी जागा नसते. अपुऱ्या सुविधा आणि अपुरी इमारत असल्याने हे आरोग्य केंद्रच आजारी पडले आहे.
 • नवीन इमारतीचे काम रखडले
  खेड तालुक्‍यातील 10 प्राथमिक आरोग्य केंद्रापैकी राजगुरुनगरचे एक आरोग्य केंद्र आहे. अस्तित्वात असलेल्या मुळ इमारतीच्या जागेवर नवीन इमारत बांधणे जागेअभावी शक्‍यच नसल्याने या आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे काम रखडले आहे. पर्यायी जागा नसल्याने भविष्यात शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्र शहराबाहेर जाण्याची शक्‍यता आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभाग, नगरपरिषद यांनीही याकडे डोळेझाक केली आहे. नवीन प्रस्ताव तयार करून शहरात आरोग्य केंद्र करणे गरजेचे असताना या प्रश्‍नाकडे मोठे दुर्लक्ष होत आहे. या आरोग्य केंद्रात रुग्णांची संख्या लक्षणीय वाढत असून जिल्हा आरोग्य प्रशासन याकडे लक्ष देत नाही.
 • तातडीच्या सेवेसाठी वेगळा कक्ष नाही
  आरोग्य केंद्रात अपघात व तातडीच्या सेवा देण्यासाठी वेगळा कक्ष नाही, ऑपरेशन थिएटर नाही. रुग्णांच्या सोबत आलेल्या नातेवाईकांना बसण्यासाठी पुरेशी जागा नाही. आवश्‍यक चाचण्या करण्यासाठी एका जुन्या इमारतीत सोय करण्यात आली आहे. आंतर व बाह्य रुग्णांची संख्या जास्त असताना अपुऱ्या जागेची मोठी समस्या सतावत आहे.
 • बेट 7 शस्त्रक्रिया 40 महिलांवर
  येथील आरोग्य केंद्रात शुक्रवारी (दि. 24) बिनटाक्‍याची शस्त्रक्रिया करण्यासाठी कॅम्प घेण्यात आला. यामध्ये सुमारे 40 महिला सभागी झाल्या होत्या. येथील दवाखान्यात केवळ 7 बेड आहेत. त्यात 40 महिला कशा ठेवता येतील हा डॉक्‍टरांपुढे प्रश्‍न होता. त्यांनी या महिलांना सांगितले येथील सुविधा अपुऱ्या आहेत. मात्र, महिलांसाठी हा बिनटाक्‍याची शस्त्रक्रिया कॅम्प फुकट असल्याने त्यात अनेक महिला सहभागी होत आहेत. महिन्यातून एकावेळी हा कॅम्प येथे घेण्यात येतो. पुण्यावरून यासाठी तज्ज्ञ डॉक्‍टर येवून शस्त्रक्रिया करतात. मात्र, ऑपरेशन झाल्यानंतर महिलांना एक रात्र दवाखान्यात काढावी लागते. अपुऱ्या सोयी अभावी महिला त्यास तयार होत आहेत. मात्र, एकप्रकारे त्यांच्या आरोग्याशी आरोग्य विभाग अन्याय करीत आहेत. वास्तविक जास्त महिला असल्यास शेजारील चांडोली ग्रामीण रुग्णालयात असे कॅम्प होणे अपेक्षित होते. मात्र, तिकडे जाण्यास महिला रुग्ण तयार होत नसल्याने आहे त्या अपुऱ्या जागेत, अपुऱ्या सुविधेत त्यांची सोय केली जात आहे. त्यामुळे महिलांना शस्त्रक्रिया केल्यानंतर जमिनीवर झोपावे लागले आहे. शिवाय तापमान 35 अंशाच्या पुढे असल्याने जीव मुठीत धरून त्यांना रात्र काढावी लागली आहे. याकडे जिल्हा परिषद आणि लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
 • या केंद्रात दररोज दीडशेपेक्षा अधिक ओपीडी होते. इमारत छोटी असल्याने रुग्णांची बसण्यासाठी आणि उपचारासाठी गैरसोय होते. आरोग्य केंद्राची इमारत जुनी झाली आहे. नव्या इमारतीची गरज आहे. शहरात प्रसूतीच्या महिलांचे प्रमाण जास्त आहे. मात्र, येथील इमारत आणि त्यातील आवश्‍यक वातावरण त्यांना सेवा देण्यास अडचणीचे होत आहे. बिनटाक्‍याची शस्त्रक्रिया करण्यसाठी महिन्यातून आकडा कॅम्प घ्यावा लागतो त्यात महिलांची संख्या मोठी आहे त्यांना सुविधा देता येत नाहीत. त्या सुविधांमध्ये माहिलांची शस्त्रक्रिया केली जाते.
  – डॉ. उदय पवार, वैद्यकीय अधिकरी, राजगुरूनगर आरोग्य केंद्र
 • आरोग्य केंद्रासाठी शासनाचा निधी मंजूर आहे मात्र इमारतीला जागा मिळत नाही. पर्यायी जागा म्हणून आरोग्य केंद्राजवळ असलेल्या पशुवैद्यकीय चिकित्सालयाची तात्पुरती जागा मिळावी अशी मागणी जिल्हा परिषदेकडे वारंवार केली आहे मात्र त्यावर निर्णय होत नाही. येथील आरोग्य केंद्राची इमारत रुगांसाठी धोकेदायक व अपुरी असल्याची बाब जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या लक्षात आणून दिली असून तसा पत्रव्यवहार केला आहे.
  – डॉ. सुरेश गोरे, वैद्यकीय अधिकारी, खेड तालुका 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)