शशीकला ट्रीटमेंट प्रकरणी आयपीएस डी. रूपा यांची बदली

बंगळुरू – कर्नाटक सरकारने कारागृह पोलिस उपमहानिरीक्षक डी रूपा यांची आज अचानक बदली केली आहे. त्यांनीच कर्नाटकातील कारागृहात असलेल्या तामिळनाडुच्या नेत्या शशीकला यांना मिळणाऱ्या व्हीआयपी सुविधेविषयीचा पर्दाफाश केला होता. त्यांची आता वाहतूक विभागात बदली करण्यात आल्याची माहिती आहे. रूपा यांच्या बरोबरच अन्य चार वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्याही राज्य सरकारने बदल्या केल्या आहेत.

या निर्णयाबद्दल विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. कारागृहांमध्ये सुरू असलेल्या बेकायदा कृत्यांना पाठिशी घालण्याचा सरकारचा डाव आहे असा आरोप जनता दल सेक्‍युलरचे नेते एचडी कुमारस्वामी यांनी केला आहे. शशीकला यांना कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यासाठी आपल्या वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दोन कोटी रूपयांची लाच घेतल्याचा आरोपही डी रूपा यांनी केला होता. त्या अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणीही केली जात आहे.

शशीकला यांना मिळणाऱ्या विशेष सवलतींबाबत डी रूपा यांनी माध्यमांना माहिती दिल्याने त्यांच्यावर राज्य सरकारने नोटीस जारी केली आहे. तामिळनाडुत बेहिशोबी मालमत्ता जमवल्या प्रकरणी शशीकला यांना पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली आहे. सध्या त्या ही शिक्षा कर्नाटकातील कारागृहात भोगत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)