शरीरसौष्ठवाच्या कुंभमेळ्यासाठी पुणे सज्ज

संग्रहित छायाचित्र

    बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडानगरीत भारत श्री स्पर्धा रंगणार

पुणे – जे आजवर कधीही घडले नाही, ते करून दाखविण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत. असंख्य अडचणींवर मात करीत येत्या 23 ते 25 मार्च दरम्यान बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडानगरीत रंगणारा भारतीय शरीरसौष्ठवाचा कुंभमेळा अर्थातच अकरावी राष्ट्रीय शरीरसौष्ठव अजिंक्‍यपद स्पर्धा अद्‌भुत, अद्वितीय, संस्मरणीय, ऐतिहासिकच होणार, असा दृढ विश्वास इंडियन बॉडीबिल्डर्स फेडरेशनचे (आयबीबीएफ) सरचिटणीस चेतन पाठारे यांनी व्यक्‍त केला. शरीरसौष्ठवाच्या इतिहासात प्रथमच 600 च्या आसपास बाहुबली म्हणजेच शरीरसौष्ठवपटू आपल्या पीळदार देहाचे प्रदर्शन करण्याचा विक्रम रचण्यासाठी गुरुवारी पुण्यात दाखल होत आहेत. यंदाचा शरीरसौष्ठवाचा सोहळा ग्लॅमरस आणि पंचतारांकित दर्जाचा करण्याची सर्व तयारी पूर्ण झाल्याचीही माहिती पाठारे यांनी दिली.

केंद्र सरकारच्या क्रीडा खात्याची मान्यता असलेल्या इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशन पुन्हा एकदा शरीरसौष्ठवाच्या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्ताने भारतीय शरीरसौष्ठवाची खरी ताकद अवघ्या विश्वाला दाखवून देणार आहे. भारतातील 41 राज्य आणि संस्थामधील तब्बल 600 खेळाडू आपले सर्वश्रेष्ठ प्रदर्शनासाठी पुण्याच्या दिशेने निघाले आहेत. काही वर्षांपूर्वी संघटनात्मक वादामुळे कमकुवत झालेला हा खेळ आता खऱ्या अर्थाने बलशाली झाला आहे. या 600 पैकी सुमारे 400 खेळाडू मुख्य शरीरसौष्ठव स्पर्धेत खेळणार आहेत. महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेतही खेळाडूंचा आकडा नेहमीपेक्षा जास्त असेल. पण फिजिक स्पोर्टस्‌ प्रकारातही खेळाडूंची संख्या विक्रमी असेल. यात देशभरातील सर्व मुख्य राज्य आणि संस्थांमधील बाहुबली शरीरसौष्ठवपटू पुण्यात खेळणार आहेत. त्यामुळे बालेवाडीत शरीरसौष्ठवाचे युद्ध रंगणार असल्याचे निश्‍चित झाले आहे.

अनंत अडचणीनंतरही राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन हे संस्मरणीयच होणार असून देशभरातून येणाऱ्या खेळाडूंवर लक्षावधी रुपयांच्या रोख बक्षिसांचा वर्षावही होणार. आजवर शरीरसौष्ठवाच्या इतिहासात जे घडले नाही ते आम्ही करून दाखविणार आहोत. 600 पेक्षा अधिक खेळाडू आणि 50 लाखांची रोख बक्षीसे हा एक विक्रमच आहे. शरीरसौष्ठवाची ताकद आणि केझ किती वाढली आहे, याचे रूप पुण्याच्या बालेवाडीत जागोजागी दिसेल, असा विश्वासही पाठारे यांनी बोलून दाखविला. खेळाच्या इतिहासात 600 खेळाडू आणि 400 पदाधिकाऱयांची पंचतारांकित निवास आणि भोजन व्यवस्था करणारी आयबीबीएफ ही भारतातील पहिलीच क्रीडा संघटना असावी, असा दावाही पाठारे यांनी केला.

     संघटनेनेच लावली ताकद

पुण्याच्या बालेवाडीत भारत श्री स्पर्धेचे आयोजन म्हणजे आयबीबीएफसाठी फार मोठे आव्हान होते. ते आव्हान चेतन पाठारे यांच्या नेतृत्वाखाली आयबीबीएफने पेलले आहे. खर्चाबाबत कुठेही आखडता हात न घेता आयबीबीएफने प्रथमच सर्व खेळाडू-पदाधिकाऱ्यांची निवास आणि भोजन व्यवस्था पंचतारांकित हॉटेलमध्ये केली आहे. आर्थिक संकटांमुळे प्रायोजकांनी पाठ दाखवल्यामुळे भारत श्रीचे आयोजन संकटात सापडले होते तेव्हा शरीरसौष्ठवाचे खरेखुरे संघटकच आयबीबीएफच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.

खुद्द व्यायाममहर्षी मधुकर तळवलकरांनी खेळाडूंच्या निवासासाठी फाइव्हस्टार व्यवस्थाच करावी, हा आग्रह धरला आणि तो पूर्णही करून दाखवला. त्यांच्याप्रमाणे ठाण्याचे प्रशांत आपटे आणि मुंबईचे अजय खानविलकर यांनीही भारत श्रीसाठी आपली आर्थिक ताकद आयबीबीएफच्या मागे उभी केली. एवढेच नव्हे तर यांचे सहकार्य पाहून शरीरसौष्ठवाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनीही स्पर्धेच्या ऐतिहासिक आयोजनासाठी आर्थिक बळ दिल्याची माहिती पाठारे यांनी दिली.
महाराष्ट्रासमोर तगडे आव्हान

यंदा स्पर्धेत अनेक विक्रम घडणार आहेत. महाराष्ट्राचा सर्वात मोठा संघ भारत श्रीसाठी सर्व ताकदीनिशी उतरणार असल्याचे 44 खेळाडूंच्या संघाने स्पष्ट दिसतेय,पण महाराष्ट्रापुढे आव्हान असेल रेल्वे, सेनादल, पंजाब, उत्तर प्रदेश व  तमिळनाडूसारख्या तगड्या संघाचे. भारताचे सर्व स्टार खेळाडू या स्पर्धेसाठी गेले तीन महिने तयारी करीत आहेत. जेव्हा खेळाडूंची नावे सर्वांसमोर येतील, तेव्हा शरीरसौष्ठव प्रीेमींची छाती अभिमानाने फुगेल. रामनिवास, यतिंदर सिंग, जावेद खानसारखे दिग्गज या स्पर्धेसाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे सलग दोनवेळा भारत श्रीचा मान मिळविणाऱ्या सुनीत जाधवला आपले जेतेपद राखणे अत्यंत आव्हानात्मक असेल, असेही पाठारे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)