शरीरसौष्ठवप्रेमी पुणेकरांना लागले पीळदार स्नायूंचे वेध

   अकरावी राष्ट्रीय शरीरसौष्ठव अजिंक्‍यपद स्पर्धा; उद्या रंगणार प्राथमिक फेरीचा थरार

पुणे – ज्या क्षणाची पुणेकरच नव्हे तर अवघा देश आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण आता दार ठोठावतोय. देशाच्या कानाकोपऱ्यातून शेकडो शरीरसौष्ठवपटूंचे पुण्यनगरीत आगमन झाले असून पुणेकरांना पीळदार स्नायूंच्या खेळाडूंचे पोझिंग पाहाण्याचे वेध लागलेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अकराव्या राष्ट्रीय शरीरसौष्ठव अजिंक्‍यपद स्पर्धेत पीळदार स्नायूंच्या पोझिंग युद्धासाठी बालेवाडीच्या बॉक्‍सिंग हॉलमध्ये मुंगी शिरेल जागा मिळणार नाही, इतक्‍या तुफान गर्दीची शक्‍यता पोलीस सूत्रांनी वर्तवली आहे. त्यामुळे शरीरसौष्ठवाच्या कुंभमेळ्यात सामील खेळाडूंचे दर्शन घेण्यासाठी पुणेकर क्रीडाप्रेमींना फार परिश्रम घ्यावे लागणार आहेत. स्पर्धेची प्राथमिक फेरी उद्या (शनिवार) रंगणार असून रविवारी अंतिम फेरी पार पडेल.

“भारत श्री’च्या निमित्ताने पुण्यनगरीत भारतातील दिग्गज आणि आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू दाखल झाल्यामुळे आज स्टेडियमजवळील पंचतारांकित हॉटेलमधील वातावरण पूर्णपणे बॉडीबिल्डिंगमय झाले होते. खेळाडूंची अभूतपूर्व उपस्थिती आणि जबरदस्त वातावरणामुळे प्रत्यक्ष बालेवाडीत क्रीडाप्रेमींची निराशा होऊ नये म्हणून मोठे एलईडी स्क्रीन लावण्याची व्यवस्था केली जाणार आहे. त्यामुळे ज्यांना प्रत्यक्षात स्टेडियममधून “भारत श्री’चा थरार पाहता येणार नाही ते क्रीडाप्रेमी भव्य एलईडीवरून स्पर्धेचा आनंद घेऊ शकतील, असे इंडियन बॉडीबिल्डर्स फेडरेशनचे सरचिटणीस चेतन पाठारे यांनी सांगितले.

भारतात दिवसेंदिवस वाढत चाललेली शरीरसौष्ठवाची क्रेझ आणि ताकद आता पुण्यातही दिसू लागलीय. दिग्गज खेळाडूंच्या आगमनामुळे शरीरसौष्ठव प्रेमींमध्ये नवचैतन्य पसरले आहे. भारतीय शरीरसौष्ठव महासंघाने शरीरसौष्ठवपटूंच्या कुंभमेळ्यासाठी सर्वार्थाने बळ लाभल्यामुळे स्पर्धेचे आयोजन न भूतो न भविष्यति होणार असल्याचे बोलले जात आहे. 600 खेळाडू आणि तब्बल 50 लाखांची रोख पारितोषिके हे सारे काही विक्रमी असल्यामुळे हा कुंभमेळा शरीरसौष्ठव जगतासाठी ऐतिहासिकच असेल, असा विश्वास पाठारे यांनी पत्रकार परिषदेत बोलून दाखविला. या वेळी माजी मिस्टर युनिव्हर्स प्रेमचंद डेग्रा, स्पोर्टस फिजिक प्रकारातील जगज्जेती श्‍वेता राठोड, तसेच स्पर्धेत सहभागी होणारे अनेक नामवंत शरीरसौष्ठवपटू उपस्थित होते.

  एकापेक्षा एक शरीरसौष्ठवपटूंची ताकद दिसणार

शरीरसौष्ठव स्पर्धेच्या इतिहासात बालेवाडीत अनेक विक्रम मोडले जाणार हे आज निश्‍चित झालेय. या स्पर्धेसाठी विक्रमी संख्येने खेळाडू आज पुण्यात दाखल झाले. स्पर्धेत सर्वात बलाढ्य संघ महाराष्ट्राचाच आहे. हॅटट्रिकसाठी सज्ज असलेल्या सुनीत जाधवला आपले जेतेपद राखण्यासाठी सर्वस्व पणाला लावावे लागणार आहे. त्याला फक्त महाराष्ट्राबाहेरील खेळाडूंकडूनच आव्हान आहे असे नाही, तर महाराष्ट्राच्या महेंद्र पगडेकडूनही त्याला कॉंटे की टक्‍कर मिळण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्राच्या संघात सागर कातुर्डे, नितीन म्हात्रे, महेंद्र चव्हाण, अक्षय मोगरकर आणि अतुल आंब्रे हे संभाव्य पदक विजेतेही खेळाडू आहेत. महाराष्ट्राची खरी लढाई रेल्वेच्या खेळाडूंशी रंगणार आहे.

आंतररेल्वे स्पर्धेचा विजेता जावेद खान, राम निवास, किरण पाटील आणि सागर जाधव हे तयारीतले खेळाडू महाराष्ट्राला कडवे आव्हान देणार हे निश्‍चित आहे. तसेच केरळचा रियाझ टी.के., रशीद, दिल्लीचा मित्तल सिंग, नरेंदर, सीआरपीएफचा हरीराम आणि प्रीतम, पंजाब पोलीसांचा हिरालाल, सेनादलाचे अनुज, महेश्वरन आणि दयानंद सिंग यांच्या सहभागामुळे यंदाची भारत श्री आणखी चुरशीची झाली आहे. त्यामुळे यंदा पुणेकरांनी स्पर्धेचा विजेता म्हणून अन्य कुणाचे नाव पाहिले तर आश्‍चर्य मानू नये.

   एक लाख अंडी आणि 6 हजार किलो चिकन

भारत श्री सर्वार्थाने ऐतिहासिक ठरणार यात वाद नाही. 600 पेक्षा अधिक खेळाडू या स्पर्धेत आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. शरीरसौष्ठव स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच सर्व खेळाडू आणि पदाधिकारी अशा तब्बल एक हजार जणांची निवास आणि भोजनाची व्यवस्था स्टेडियमनजीकच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. त्याचबरोबर खेळाडूंना यादरम्यान त्यांच्यासाठी सकस आहार पुरविणे हेसुद्धा एक मोठे आव्हान असते. त्याच्या आहारात मीठ, मसाला आणि तेल काहीही नसते. खेळाडूंच्या आहारासाठी 1 लाख अंडी आणि 6 हजार किलो सोललेले चिकन मागविण्यात आले आहे. हा फक्त खेळाडूंचा तीन दिवसांचा सकस आहार असून फळे व अन्य पूरक आहाराचीही सोय करण्यात आल्याचे चेतन पाठारे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)