शरद यादव यांना जेडीयूच्या राज्यसभा गट नेतेपदावरुन हटवले !

नवी दिल्ली : बिहारच्या राजकिय वर्तुळात आणखी एक मोठी घटना घडली आहे. सतत पक्षविरोधी भूमिका घेतल्याने जेडीयूचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शरद यादव यांना जेडीयूच्या राज्यसभेच्या गट नेतेपदावरुन हटवण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.

शरद यादव यांच्या जागी आरसीपी सिंह यांची गट नेतेपदी नियुक्ती केली जाणार आहे. जेडीयूच्या खासदारांची आज सायंकाळी 5 वाजता बैठक होणार आहे. या बैठकीत अधिकृतपणे निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आहे. बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आरजेडीचे लालू प्रसाद यादव यांच्यासोबतच्या वादानंतर भाजपसोबत सत्ता स्थापन केली. यापूर्वी शरद यादव दिल्लीतून पाटण्यात दाखल झाल्यानंतर, आपण महायुतीसोबत असल्याचे वक्तव्य केले होते. तसेच बिहारच्या 11 कोटी जनतेने 2015 च्या विधानसभा निवडणुकीत पाच वर्षांसाठी महायुतीला जनादेश दिला होता, असे म्हणत नितीश कुमारांना घरचा आहेर दिला होता. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या संपत्तीवरील सीबीआयच्या छापेमारीनंतर, नितीश कुमारांनी 26 जुलै रोजी स्वत: च आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. पण दुसऱ्याच दिवशी म्हणजे, 27 जुलै रोजी भाजपसोबत युती करत, पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)