शरद पवार नाणारला भेट देणार

संघर्ष समितीचे नेत्यांनी घेतली भेट
मुंबई – नाणार येथील प्रस्तावित ग्रीन रिफायनरीच्या संदर्भात केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी सामंजस्य करार केल्यानंतर त्याचे संतप्त पडसाद कोकणात उमटू लागले आहेत. या प्रकल्पाला विरोध व्हावा यासाठी नाणारच्या संघर्ष समितीने राजकीय नेत्यांना साकडे घालायला सुरूवात केली आहे. समितीच्या सदस्यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. या भेटीनंतर समितीचे सदस्य उद्या (शनिवार) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन प्रकल्प रद्द करण्याची मागणी करणार आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी यापूर्वीच नाणार प्रकल्पाला कडाडून विरोध केला आहे. कोकणातील जनतेवर नाणार प्रकल्प लादला जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असतानाही ग्रामस्थांना अंधारात ठेवून केंद्र सरकारने सौदी अरेबियाच्या अरामको कंपनीशी सामंजस्य करार केला. या करारामुळे स्थानिक नागरीकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

प्रकल्प हाणून पाडण्यासाठी राज्यातील नेत्यांच्या भेटीगाठी घ्यायला सुरूवात केली आहे. नाणार रिफायनरी विरोधी शेतकरी, मच्छीमार संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज पवार यांची “सिल्वर ओक’ या निवासस्थानी भेट घेतली. प्रकल्पग्रस्तांच्या भावना जाणून घेतल्यानंतर पवारांनी येत्या 10 मे रोजी नाणारला भेट देणार असल्याचे सांगितले. नाणार ग्रामस्थ तसेच शेतकरी, मच्छीमार यांच्याशी चर्चा केल्यानंतरच प्रकल्पाच्या संदर्भात आपण भूमिका घेऊ, असे पवार यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)