शरद पवारांनी लावला डोक्‍याला हात

केंद्र सरकारच्या कार्यक्रमात स्तुती नको, भाषण आवरा.. म्हणण्याची वेळ
बारामती – शरद पवार यांनी कोंबड्यापासून जनावरांपर्यंत सगळे काही दिले, शरद पवार पंतप्रधान व्हावेत, मी तुमचाच कार्यकर्ता आहे, शरद पवारांना 101 वर्षांचे आयुष्य लाभो, अशा कौतुकास्पद वाक्‍यांची रिघच एक नाही तर अनेक ज्येष्ठ नागरिकांनी केंद्र सरकारच्या कार्यक्रमात शरद पवार यांच्या समोर ओढल्याने शरद पवारांनी चक्क डोक्‍याला हात लावला एवढेच काय तर भाषणबाजी आवण्यासाठी ते व्यासपीठावरूनच ज्येष्ठांना खाणाखुणा करीत होते.

बारामतीत वयोश्री योजनेअंतर्गत कृत्रिम अवयवदान आणि इतर उपकरणांचे वितरण करण्यात आले. मात्र, यावेळी आपल्या मनोगतात ज्येष्ठ नागरिकांनी योजनेविषयी न बोलता थेट शरद पवार आणि राष्ट्रवादीचे गोडवे गाण्यास सुरुवात केली. त्यामुळे मंचावर उपस्थित असणाऱ्या शरद पवारांनी डोक्‍याला हात लावला. आणि लाभार्थींचे मनोगत थांबविण्याच्या सूचना केल्या. हा सर्व प्रकार घडला तेंव्हा उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सहाय्य मंत्रालय, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती लोकसभा मतदार संघातील 60 वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांना वयोश्री योजनेंतर्गत कृत्रिम अवयव तसेच सहाय्यभूत उपकरणांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये एकूण 3270 लाभार्थ्यांना याचा लाभ देण्यात आला. यावेळी लाभार्थी वृद्धांना मिळालेल्या वयोश्री योजनेबाबत मनोगत व्यक्त करण्यास सांगितले.

काही ज्येष्ठ नागरिकांनी आपले मनोगत मांडण्यात सुरुवात केली. पण, त्यांनी या योजनेच्या लाभाऐवजी शरद पवार, सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस विषयी गोडवे गाऊ लागल्याने शरद पवारांनी त्या नागरिकांस तत्काळ थांबण्याची विनंती केली. दुसऱ्या ज्येष्ठ नागरिकानेही उठून पहिल्याचीच री ओढली. यावेळी मात्र पवारांनी डोक्‍याला हात लावून पुन्हा त्या व्यक्तीला थांबविण्याच्या सूचना केल्या. या योजनेच्या लाभाऐवजी हे नागरिक पक्षाचेच गुणगान गात असल्याने, हा प्रकार होत असताना सभागृहामध्ये एकच हशा पिकला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
1 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)