शरदनगर क्रीडांगणावर सुविधांची वानवा

पिंपरी – चिखली येथील सेक्‍टर क्रमांक 19 मधील शरदनगर क्रीडांगणाचा लहान मुले क्रिकेट खेळण्यासाठी तर मोठी माणसे जॉगिंग ट्रॅक म्हणून करत आहेत. मात्र या मैदानावर सुविधांची वानवा असून ठेकेदार नेमूनही देखभाल, दुरुस्ती, सुरक्षा व स्वच्छेतेसाठी दुर्लक्ष झाले आहे. कर्मचारी न पुरवता ठेकेदार व अधिकारी संगनमताने खर्च लाटत असल्याचा आरोप नागरिकांनी केला.

या मैदानासाठी एक मुख्य प्रवेशद्वार व दुसरे लहान प्रवेशद्वार आहे. तसेच या ठिकाणी सुरक्षा रक्षक नसल्यामुळे मैदानावर कोणीही, कधीही ये-जा करत असतात. त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. तसेच येथे स्वच्छतेसाठीही कर्मचारी नेमला नसल्याने मैदानावर सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून मैदानावर झाडे, झुडपे उगवली आहेत. खेळाडूंसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आलेली नाही. मैदानावर कागद, प्लाटीक पिशव्या, गुटखा, तंबाखु व सिगारेटची पाकिटे पडलेली आढळून आली. तसेच मैदानासाठी लावण्यात आलेल्या वीजेच्या खांबावरील निम्मे वीज दिवे बंद असल्याचेही समोर आले आहे. तसेच मैदानावरच्या वीज मिटरची पेटी उघडीच असून ती मैदानाच्या प्रवेशद्वारा जवळ जमिनीलगत असल्याचे पावसाळ्यात वीजेचा धक्का बसण्याचा धोका आहे. मैदानावर सर्वत्र बारीक खडे व दगड पडले असून त्यामुळे वेळा खेळाडू जखमी होत आहेत.

जवळपास महापालिकेच्या सर्वच मैदानासाठी देखभाल, दुरुस्ती, सुरक्षा, स्वच्छतेसाठी ठेकेदार नेमले आहेत. या मैदानासाठीही ठेकेदार नेमला आहे. मात्र प्रत्यक्षात या मैदानावर सेवा-सुविधा, देखभाल, दुरुस्तीसाठी किंवा सुरक्षा करण्यासाठी कोणीही उपलब्ध नसते. त्यामुळे महापालिका ठेकेदाराला फुकट का पोसत आहे ? ठेकेदार कामेच करणार नसतील तर महापालिका त्यांचे लाड कशासाठी करते, असा सवाल नागरिक करत आहेत. महापालिका अधिकारी व ठेकेदार मिळून नागरिकांच्या पैशाला चुना लावण्याचे काम करत आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्त व संबंधित नगरसेवकांनी लक्ष घालून ठेकेदारांना कामे देवू नयेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

खेळाडूंच्या मागण्या
– पिण्याच्या पाण्याची सोय करावी
– स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करावी
– देखभाल, दुरुस्तीसाठी कर्मचारी नेमावेत
– मैदानाची नियमीत स्वच्छता करावी
– विद्युत व्यवस्था अद्ययावत करावी
– मैदानावरील झाडे, झुडपे त्वरीत हटवावीत


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)