शरथ कमल-मनिका बात्रा जोडीला ऐतिहासिक कांस्य

टेबल टेनिसमध्ये संस्मरणीय कामगिरी

जकार्ता: अनुभवी शरथ कमल आणि स्टार खेळाडू मनिका बात्रा या भारतीय जोडीने मिश्र दुहेरी टेबल टेनिसमध्ये कांस्यपदकाची कमाई केली असून त्यांची ही कामगिरी ऐतिहासिक ठरली आहे. भारतीय पुरुष टेबल टेनिस संघाने कालच आशियाई क्रीडास्पर्धेतील पहिल्यावहिल्या ऐतिहासिक कांस्यपदकाची कमाई करताना गेल्या 60 वर्षांची प्रतीक्षा संपविली होती. आशियाई स्पर्धेतील टेबल टेनिसमध्ये भारताने प्रथमच दोन पदके मिळविली आहेत.

शरथ-मनिका या जोडीला मिश्र दुहेरीतील उपान्त्य फेरीत यिंगशा सुन आणि चुक्‍विन वॅंगिन या चीनच्या अव्वल जोडीकडून 9-11, 5-11, 13-11, 4-11, 8-11 असा संघर्षपूर्ण लढतीनंतर पराभव पत्करावा लागल्याने कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याआधी शरथ-मनिका जोडीने उपान्त्य फेरीत धडक मारताना आशियाई क्रीडास्पर्धेतील टेबल टेनिसमध्ये आणखी एका पदकाची निश्‍चिती केली होती. भारताच्या महिला संघानेही सांघिक स्पर्धेच्या बाद फेरीत धडक मारली होती. मात्र त्यांचे स्पर्धेतील आव्हान उपान्त्यपूर्व फेरीत संपुष्टात आले.

दरम्यान, शरथ कमल व मनिका बात्रा या भारतीय जोडीने मिश्र दुहेरीतील उपान्त्यपूर्व फेरीत सिम हयो चा व सोंग जि ऍन या कोरियाच्या जोडीचा कडवा प्रतिकार 4-11, 12-10, 6-11, 11-6, 11-8 असा मोडून काढताना अखेरच्या चार जोड्यांमध्ये स्थान मिळविले. उपान्त्य फेरीतील प्रवेशामुळे शरथ-मनिका जोडीचे किमान कांस्यपदक निश्‍चित झाले आहे.
शरथ-मनिका जोडीने त्याआधी जावेन चूंग व केरेन डिक या मलेशियन जोडीचा 11-2, 11-5, 11-8 असा सरळ गेममध्ये धुव्वा उडविताना दुसरी फेरी गाठली होती. तसेच उत्तर कोरियाच्या जिही जेओन व सॅंगसू ली या जोडीचा 11-7, 7-11, 11-8, 10-12, 11-4 असा संघर्षपूर्ण लढतीनंतर पराभव करताना त्यांनी उपान्त्यपूर्व फेरीत स्थान मिळविले होते.

मधुरिका पाटकर व अँथनी अमलराज या भारतीय जोडीनेही लिलिस इद्रियानी व डॉनी ऍजी या इंडोनेशियन जोडीचे आव्हान 11-4, 11-13, 11-8, 11-9 असे संपुष्टात आणताना मिश्र दुहेरीच्या उपउपान्त्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. परंतु हो क्‍वान किट व ली हो चिंग या हॉंगकॉंगच्या मानांकित जोडीविरुद्ध त्यांना 11-6, 7-11, 5-11, 4-11 असा पराभव पत्करावा लागल्याने त्यांचे आव्हान उपउपान्त्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)