शब्दाचे मोल

कहे गये दास कबीर…

  – अरुण गोखले

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

      दोहा-
शब्द बराबर धन नहीं, जो कोय जानै बोल।
हीरा तो दामों मिले, शब्दहीं मोल न तोल।।

     मराठी भाषांतर-
शब्दा सम ना धन ते दुसरे, जो जाणे शब्दाचे मोल।
हिरे मिळती विकत धनाने, शब्द परि ते हो अनमोल।।

  भावार्थ –
आपण जर खरंच द्रष्टेपणाने पाहिले तर आपल्याला असे दिसते की- या जगात काही माणसे ही पैशाने, धनाने, संपत्तीने नाही तर मनाने मोठी असतात. अशा मनाने मोठ्या असणाऱ्या लोकांच्याकडे असते ती लाख मोलाच्या शब्दांची संपत्ती. तेच त्यांच लोकांना जोडण्याच, त्यांना आपलंस करण्याचं मोठं भांडवल असतं. अशा माणसांचे विश्‍वास दर्शवणारे, धीर देणारे, आपलं कोणीतरी पाठीराखं आहे. हा दिलासा देणारे शब्दच अनेकांना लाख मोलाचा आधार देऊन जातात. केवळ शब्दाच्या आधारावरच अनेक निराधार जीव हे नवी जगण्याची उमेद घेऊन उभे राहतात. तू लढ… मी आहे, असं म्हणून पाठीवर टाकलेली थाप ही प्रचंड बळ देऊन जाते.

शब्दांच्या अभिवचनावरच जन्मोजन्मीची अतूट नाती जोडली जातात. माणसं माणसांच्या जवळ येतात आणि एका अनामिक अशा प्रेमधाग्यात घट्ट बांधली जातात, तीसुद्धा दिल्या घेतल्या शब्दानेच. कोणी कोणी तरी दिल्या शब्दासाठी, कार्यासाठी, व्यक्‍तीसाठी, देशासाठी, मानवतेसाठी, आपलं जीवनही अर्पण करतात. त्यामुळेच असं म्हणावसं वाटत की खरोखरच शब्द ही एक संपत्ती आहे. तिचा वापर हा धनाइतकाच तोलून मोलून करायला हवा. जे मोलाचं आहे ते तेव्हढंच जपून आणि हातच राखूनच वापरायला हवं नाही का? उगाच मागचा पुढचा विचार न करता शब्द संपत्ती कवडीमोलांनी वाया घालविण्यात काय अर्थ आहे? या दोह्यात कबीर आपल्याला शब्दाचे महत्त्व स्पष्ट करून सांगत आहेत.

ते म्हणतात- शब्दासारखे दुसरे धन नाही. त्यामुळेच प्रत्येकाने त्याचा वापर हा विचारपूर्वकच करायला हवा. ज्याला शब्दाचे मोल आहे तो प्रत्येक शब्द तोलूनमापून बोलतो. आपले साधू संत आणि सदगुरू हे पाहा. ते फार कमी बोलतात. त्यांनी उच्चारलेल्या शब्दांमागे एक अलौकिक शक्‍ती असते. कबीर असं ही सांगतात की बाबाहो! एक वेळ हिरे, मोती या सारख्या किमती वस्तू या पैशाच्या तराजूत तोलून विकत घेता येतात. पण शब्द इतके अनमोल आहेत की ते असे कोठेही विकत घेता येत नाहीत. त्यांचा वापर हा संयमितच करावा लागतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)