शब्दवेध

   अबानधपक्‍या

काही काही ग्रामीण शब्द नक्‍की कोठून आले याचा शोध लागत नाही. पण त्यांना एक नाद असतो, लय असते. त्यांच्या उच्चारणातून त्याचा अर्थ पोहोचायला मदत होते. “आसं अबानधपक्‍या कसं आलाया. आधी कळवलं असता तर गाडी धाडून दिली असती स्टेशनावर,’ किंवा “अशी अबानधपक्‍या कोर्टाची नोटीस आली आनी मी घाबरून गेलो.’ अशी वाक्‍य कानावर पडली.

अबानधपक्‍या या शब्दाबद्दल कुतूहल निर्माण होतं. अबानधपक्‍या म्हणजे अकस्मात किंवा अवचित. काही कल्पना नसताना अचानक घडून येणे यातला “धपक्‍या’ हा शब्द “धप्पकन’शी साधर्म्य दर्शवणारा वाटतो. यात एक नाद ध्वनी आहे. “पाय घसरून पडलो.’ असं म्हणताना तसं नुसतं न म्हणता “धापकन पाय घसरून पडलो.’ असं म्हटलं की पडल्यावरचा धप्पकन आवाजही कानावर आल्यासारखा वाटतो. पूर्वकल्पना न मिळता ती क्रिया घडलेली असते. तोच भाव काहीसा “अबानधपक्‍या’मध्ये असावा.

काही ठिकाणी खेड्यात अचानक काही बातमी ऐकली व ती वाईट बातमी असली तर ते ऐकून मला “धपकी भरली’ असं म्हणतात. अर्थात हा इथला “धपकी’ शब्द “धडकी’ वरून आला असावा किंवा धडकीचा अपभ्रंश म्हणून त्याचं “धपकी’ झालं असावं. “अबानधपक्‍या’मधील अबानचा अर्थ नक्की लागत नाही. काही वेळा अबान म्हणजे “चाहूल न देता’ असं सांगितलं जातं. असे खूपसे वेगळे वाटणारे पण वाक्‍याला अर्थ देणारे शब्द मराठी भाषेत आहेत. ते तसं म्हटलं तर एक प्रकारचं मराठी भाषेचं वैभव आहे.

 जावईशोध

“आता बास करा तुमचं बोलं उगाच कोणता जावईशोध लावू नकासा,’ असं जेव्हा कानावर पडतं तेव्हा “जावईशोध’ याचा अर्थ काय असेल याची जिज्ञासा निर्माण होते. हा तसा बोलीभाषेतलाच शब्द. पण तो खूप काळापासून वापरात असणारा आहे.

“जावई’ म्हणजे मुलीचा नवरा. सासूरवाडीला जावयाचे कौतुक असतेच. सणासुदीला तो आला की त्याचा शब्द झेलणेस सासूरवाडीतली मंडळी तत्पर असतात. जावई जे म्हणेल ते खरे, अशा भक्‍तिभावाने सगळे त्याचे ऐकतात आणि मग त्यामुळे जावई ही बढाया मारू लागतो. मुळात जे घडले असते त्यात स्वतःचे आणखी घालून बढाया मारू लागतो. काही वेळा जे मुळात नसतेच ते हा खरे समजून सांगायला लागतो.

“खोटं बोल पण रेटून बोल’ अशा पद्धतीनं खोट्याची बढाई म्हणजे “जावईशोध’ त्यामुळे मग माणूस नसलेली गोष्ट दाबून खरी म्हणून सांगण्याचा प्रयत्न करू लागला की “उगाच जावईशोध लावण्याचा प्रयत्न करू नको’ असं म्हणतात. जावई हे नाजूक नातं. ग्रामीण भाषेत “जावई म्हणजे अवघड जागेचं दुखणं.’ त्याला दुखवता येत नाही. कारण लेक त्याला दिलेली असते.

त्याला दुखवलं तर तो लेकीला दुःख देईल. लेकीला त्रास होऊ नये म्हणून मग जावयाला सांभाळायचा. “जावई माझा भला’ हे त्यातून आलं असावं. अशा “जावई’ नात्यातून “जावईशोध’ हा शब्द जन्माला आला असावा. जावयाला “दशम्‌ग्रह’ असं संबोधलं जातं. नवग्रह राशीला येतात तसा जावईसुद्धा असाच त्यातून संबोधित करायचं असावं.अशा जावयाच्या बढाईखोरपणातून जन्मलेला शब्द म्हणजे “जावईशोध’.

 – डॉ. राजेंद्र माने


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)