“शब्दवेध’ने जपला वाचन संस्कृतीचा ठेवा

सामाजिक घडामोडींबाबत अपडेट राहण्याचा अनोखा प्रयत्न

सुनीता शिंदे

कराड –आज सोशल मीडियाच्या जमान्यात वाचन चळवळ लोप पावत चालली असून ग्रंथालयेही ओस पडू लागली आहेत. बालपणीच हातात मोबाईल मिळत असल्यामुळे चिमुरड्यांची बोटे पुस्तकांवर फिरण्याऐवजी स्क्रिन टच मोबाईलवर फिरताना सर्रास दिसतात. अशा परिस्थितीत वाचन संस्कृती वाढणे कठीण झाले आहे. परंतु कराडची काही मंडळी त्यासाठी खटाटोप करीत आहे. शब्दवेध या संस्थेच्या माध्यमातून गेली 18 वर्षे वाचन संस्कृती जपण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु आहे. ही मंडळी शब्दवेधच्या माध्यमातून एकावेळी 25 ते 30 पुस्तकांचे वाचन करतात. पुस्तकांच्या माध्यमातून सामाजिक घडामोडींबाबत अपडेट राहण्याचा यांचा हा अनोखा प्रयत्न कौतुकास्पद आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कराड येथील अरुण काकडे यांनी या उपक्रमाची संकल्पना मित्र राजेंद्र लाटकर यांच्याकडे मांडली. काकडे यांना वाचनाची प्रचंड आवड होती. शाळेत जाण्याची इच्छा नसणाऱ्या कोवळ्या वयातच त्यांनी पुस्तके वाचायला सुरुवात केली ती आज वयाच्या 62 व्या वर्षीही जोपासली आहे. आपण वाचलेल्या लेखकाचे पुस्तक आपणाला कसे वाटले. ते इतरांना सांगावे असे त्यांना नेहमी वाटे. पण त्यासाठी पुस्तकप्रेमी दर्दीही पुढे असणे गरजेचे आहेत. हा विचार करुन राजेंद्र लाटकरांसमवेत 23 फेब्रुवारी 2012 रोजी एक आगळावेगळा उपक्रम सुरु केला. आठवड्यातून एक दिवस आपण वाचलेल्या पुस्तकाचे परिक्षण मांडायचे असे दोघांनी ठरवले. या दोघांमध्ये पुढे संजय गोसावी, नरेंद्र वळवडे या दोघांची भर पडली आणि सदस्य वाढतच गेले. हा वाचकप्रेमी परिवार चौघांवरुन आज 55 सदस्यांपर्यंत पोहोचला आहे.

प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी ज्या सदस्यांना शक्‍य आहे, अशी पंचवीस ते तीस सदस्य एकत्र जमतात व आपण वाचलेल्या पुस्तकाचे परिक्षण करतात. त्यामुळे एकावेळी विविध लेखकांची एकूण 25 पुस्तकांची माहिती सर्वांना होते. या सदस्यांमध्ये वैद्यकीय, इंजिनिअर, सामाजिक सर्वच क्षेत्रातील लोकांचा समावेश आहे. प्रत्येकजण आपल्या आवडीप्रमाणे पुस्तक वाचन करतो आणि त्यांचे परिक्षण सांगतो.

या संस्थेचे नामकरण शब्दवेध असे करण्यात आले असले तरी यात अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार असे पद नाही की एकही रुपयांची वर्गणी नाही. बिनखर्चाची चालणारी ही एकमेव संस्था आहे. येथे खर्च होतो तो फक्‍त शब्दांचाच. समाजामध्ये घडाणाऱ्या विविध घडामोडींचा ऊहापोह ही येथे केला जात असल्याने वाचनातून अपडेट राहण्याचा त्यांचा अनोखा प्रयत्न आहे. त्यासाठी त्यांना मोबाईलची गरज भासत नाही. संस्थेच्या सदस्यांनी 23 एप्रिल हा वाचकदिन साजरा करण्यास सुरुवात केली.

या दिवशी त्यांनी संपूर्ण कराड शहरात वाचन दिनाचे फलक लावले होते. तसेच त्यावर संत तुकारामांची वचनेही लिहली होती. तर 23 फेब्रुवारी हा संस्थेचा वर्धापनदिन म्हणून साजरा केला जातो. यादिवशीही होते पुस्तकातील शब्दांची देवाणघेवाण परंतु ती कुटुंबियांसमवेत. त्यांच्या वाचनप्रेमाला त्यांच्या कुटुंबियांनीही आपलेसे केले आहे. अनेक लेखक, साहित्यीकांना बोलावून त्यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले जाते. तसेच उत्कृष्ट वाचक पुरस्कारही दिला जातो. अनेक ग्रंथपालांनाही सन्मानित करण्यात आले आहे. वाचन एक समृद्ध अनुभूती या श्‍लोगन प्रमाणेच त्यांनी वाचन चळवळ जोपासली असून ही इतरांना आदर्शवत अशीच आहे.

रिमांडहोम मधील मुलांसाठी कथाकथन
पहिली ते सातवीमधील मुलांना वाचनाची आवड लागावी. यासाठी शब्दवेध ही संस्था प्रयत्न करत आहे. याच अनुषंगाने येथील रिमांडहोममधील मुलांना कथाकथन विविध माध्यमातून वाचनाचे महत्त्व पटवून देण्याचा अनोखा प्रयत्न केला जात आहे. प्रत्येक आठवड्यात अरुण काकडे तेथे जाऊन मुलांशी संवाद साधतात, लेखकांच्या कथा ऐकवतात.
घरीच बनवले वाचनालय

अरुण काकडे यांना बालपणापासूनच वाचनाची आवड असल्याने त्यांनी त्यांच्या घरीच वाचनालय बनविले आहे. तेथे जवळपासून एक हजाराहून अधिक पुस्तके पहायला मिळतात. ज्याला वाचनाची आवड आहे. त्याला त्यातील पुस्तके वाचायला देतात आणि संस्थेचा सभासदही बनवितात. एका माणसाची खरी गोष्टफ हे त्यांचे पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे.
अन्‌ वाचकप्रेमी लिहिते झाले…

पुस्तकांचे परिक्षण, वाचन, चर्चा करता करता हे वाचकप्रेमी लिहिते झाले आहेत. बैठकीच्यावेळी कोणताही एक शब्द घेऊन त्यावर वेगवेगळ्या प्रकारे सर्व सदस्य लिखाण करतात. हे सर्व लिखाण संग्रहित ठेवण्यात आले असून त्यातील निवडक लिखाणाचे पुस्तक प्रकाशित करण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)