शब्दब्रम्ह्य गणपतीचे प्रतीक आहे ॐकार…(गणेश नाममाहात्म्य)

ओंकार :  गणपती शब्दब्रह्म असून “ॐकार’ त्याचे प्रतीक आहे. सृष्टीचा हा आदिकंद. परब्रह्याचे हे पहिले व्यक्त स्वरूप. यातील परब्रह्मापासून शुभारंभी गगन उत्पन्न झाले आणि त्यातून एकाक्षरी मंत्राचा नाद सर्वत्र घुमला. तो हा एकाक्षरी मंत्र म्हणजे “ॐ’.

आकाशातून हा मंत्रनाद घुमल्यावर त्या ॐ काराच्या मनामध्ये सृष्टी निर्माण करावी, असे आले. ओंकाराने या सृष्टीच्या उत्पत्ति – स्थिति – लयाचे कार्य अनुक्रमे ब्रह्मदेव – विष्णू आणि शंकरांवर सोपविले. पण सृष्टीची उत्पत्ती करायची म्हणजे नेमके काय करायचे, असा प्रश्‍न ब्रह्मदेवाने ॐकारासमोर मांडला. तेव्हा ओंकाराने ब्रह्मदेवाला आपल्या श्‍वासनलिकेतून आपल्या लंबोदरात आणून सोडले, तेव्हा अनन्त ब्रह्माण्डातील चराचर सृष्टीचे दर्शन त्याला झाले. परंतु ते विराट दर्शन असह्य होऊन ब्रह्मदेवाने आपल्याला बाहेर काढावयास सांगितले. ॐकाराने त्याला उदरातून बाहेर काढले. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले , “”हे ओंकारा, तुम्ही मला मार्गदर्शन केले तर मी नक्की सृष्टी उत्पन्न करू शकेन असा मला गाढ आत्मविश्‍वास आहे.” आपण अगदी सहज सृष्टी निर्माण करू शकतो, असा गर्व ब्रह्मदेवाच्या मनात उत्पन्न झाला. त्यासाठी ॐकाराच्या मार्गदर्शनाची काही आवश्‍यकता नाही, असा काही काळानंतर त्याच्या मनात ताठा निर्माण झाला. हे ॐकाराच्या लक्षात आले. त्याने आपल्या अद्भुत शक्तीने ब्रह्मदेव जेथे सृष्टी निर्माण करायला गेला होता, तो हजारो मैलांचा आसमंत जलमय करून टाकला.

प्रचंड खोली आणि व्याप्ती असलेल्या जलाशयात एकच एक वटवृक्ष मात्र ताठ उभा होता – अक्षयवट. त्याचे एक पान खाली पडले आणि जलाशयावर तरंगू लागले. त्या पानावर एक लहान बालक दिसू लागले. त्याला सुंदरशी सोंड होती. त्यातून एक दात दिसत होता. त्याला चार हात होते. त्याच्या डोक्‍यावर रत्नमुकुट होता. गळ्यात मोत्याची माळ होती. कपाळावर चंद्रकोर होती. त्या प्रचंड महासागरात वटपत्रावर पहुडलेले त्याचे रूप दिसताच ब्रह्मदेवाला या बाल ॐकाराच्या सामर्थ्याची कल्पना आली. तो नतमस्तक झाला. तेव्हा आकाशवाणी झाली, “”ब्रह्मदेवा, मनात ताठा निर्माण होणे हे कोणत्याही कार्यातील पहिले विघ्न असते. एकाक्षरी मंत्राने तुझे हे विघ्न दूर होईल.” ब्रह्मदेवाने जलाशयात उभे राहून ॐ मंत्राचा जप सूरू केला. ते अनुष्ठान पूर्ण होताच तेथे प्र-याग म्हणजे मोठा याग सुरू केला. तो गणेशयाग होता. तेव्हा ब्रह्मदेवांपुढे ॐकार गणेश येऊन उभा राहिला. ॐकार स्वरूप गणेशाची ब्रह्मदेवांनी पूजा केली व दक्षिणा म्हणून ऋद्धी व सिद्धी या आपल्या दोन लाडक्‍या कन्या ॐकाराला दिल्या. त्यांचा विवाह लावून दिला. ॐकार गणेश सिद्धिबुद्धिंसहित अंतर्धान पावला. हे क्षेत्र प्रयाग येथे अक्षयवटानजीक प्रतीकात्मक स्वरूपात आहे. हाच तो “ॐकार’ गणेश!

–  दीपक कांबळे

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)