शबरीमलाबाबत सर्वपक्षीय बैठक अपयशी 

दोन दिवसांनी मंदिराचे दरवाजे उघडणार 

थिरुवनंतपुरम – शबरीमला मंदिरामध्ये सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी कशाप्रकारे करायची, हे ठरवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये आज कोणताही निष्कर्श निघू शकला नाही. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यावर राज्य सरकार ठाम आहे, तर विरोधकांचा त्या निर्णयाला विरोध आहे. बैठकीमध्ये निष्कर्श निघू न शकल्यामुळे विरोधकांनी बैठकीतून सभात्याग केला.

सुमारे तीन तास चाललेल्या या बैठकीमध्ये दोन्ही बाजूंकडून जोरदार चर्चा झाली. मात्र ही बैठक म्हणजे फार्स असल्याची टीका विरोधी “युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट’ आणि भाजपकडून करण्यात आली. या आदेशांच्या अंमबजावणीसाठी केरळ सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडून अधिक अवधी मागून घ्यावा, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली. मात्र मुख्यमंत्र्यांनी ही मागणी सपशेल फेटाळून लावली. या आदेशांचा फेरविचार करण्याबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली असून त्यावर 22 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.

दोनच दिवसांनी म्हणजे 17 नोव्हेंबरला मंदिराचे दरवाजे दोन महिन्यांच्या यात्रेसाठी उघडणार आहेत. या दरम्यान लाखो भाविक याठिकाणी येणे अपेक्षित आहे. सर्व वयोगटातील महिलांना भगवान अय्यप्पा यांच्या पूजेसाठी मंदिरात प्रवेश देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने 28 सप्टेंबर रोजी दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी करण्यास सरकार बांधील आहे. या आदेशांच्या अंमलबजावणीशिवाय राज्य सरकारपुढे अन्य कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नाही, असे मुख्यमंत्री पीनारई विजयन यांनी म्हटले आहे. या आदेशांनंतर राज्यभर आंदोलन व्हायला लागल्यामुळे सर्व पक्षांमध्ये सहमतीसाठी मुख्यमंत्र्यांनीच सर्वपक्षीय बैठक बोलावली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)