शनिवारवाड्यावर सांस्कृतिक कार्यक्रम का नाही?

महापौरांची मध्यस्थी : सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय सभासदांचा आक्षेप

पुणे :  शनिवारवाड्यावर शासकीय आणि महापालिकेचे कार्यक्रम वगळता इतर कार्यक्रमांना बंदी घालण्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार महापालिका आयुक्‍तांना कोणी दिला? तसेच कोणाच्या दबावाखाली हा निर्णय घेतला याचा खुलासा करावा, अशी मागणी करत सर्वपक्षीय नगरसेवकांनी आयुक्‍त कुणाल कुमार यांच्यावर टीका केली. त्यानंतर अखेर या गोंधळातच महापौर मुक्ता टिळक यांनी मध्यस्थी करत या बाबतचा निर्णय पक्षनेत्यांच्या बैठकीत घेऊन तो मुख्यसभेत आणला जाईल. त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल असे सांगत या वादावर पडदा टाकला.

भीमा-कोरगाव घटनेनंतर महापालिका प्रशासनाने शनिवारवाडयावर कार्यक्रमांना बंदी घालण्याचा निर्णय अचानक घेतला. त्यावरून टीका झाल्यानंतर महापौर मुक्ता टिळक यांनी या प्रकरणी मध्यस्थी करत आयुक्‍तांचे आदेश रद्द केले. तसेच पुढील निर्णय होईपर्यंत कोणत्याही कार्यक्रमांना बंदी घालण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले. त्याचे पडसाद मुख्यसभेत उमटले.

-Ads-

सभेत भाजपचे सभासद धीरज घाटे यांनी या विषयाला सुरूवात केली. “ज्या शनिवरवाड्यावर स्वातंत्र्याचा उत्सव साजरा झाला तो शनिवारवाड्यावर कार्यक्रम घेण्यास बंदी का घालण्यात आली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आयुक्तांनी सभागृहाला न विचारता हा निर्णय घेतला असून तो मागे न घेतल्यास येत्या शिवजयंतीला तिथे कार्यक्रम घेऊ’ असा इशाराही त्यांनी दिला.

त्यानंतर कॉंग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांनी हे आदेश कोणी काढले असून त्यांनी कोणाच्या दबावात हा निर्णय घेतला असे त्यांनी विचारले. यावेळी संजय भोसले, बाळा ओसवाल, दिलीप बराटे, विरोधीपक्षनेते चेतन तुपे, सुभाष जगताप यांची भाषणे झाली. या सर्वच नगरसेवकांनी महापालिका आयुक्तांच्या या निर्णयावर टीका करत तातडीने याबाबतचा नवीन आदेश देण्याची मागणी केली.

यावेळी महापौरांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी भाजपकडून प्रशासनास पाठीशी घातले जात असल्याचे आरोप विरोधकांकडून करण्यात आला. अखेर महापौर टिळक यांनी “या विषयावर माझीही नाराजी असून सर्वसाधारण सभाच याबाबत निर्णय घेणार’ असल्याचे सांगितले. सध्या हे विषयपत्र पक्षनेत्यांच्या बैठकीत चर्चेला येणार असून मग सभेसमोर येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. शनिवारवाडा ही महापालिकेची मिळकत असून याबाबत निर्णय होत नाहीत तोवर कार्यक्रम सुरूच राहतील अशी ग्वाहीही त्यांनी दिली. त्यानंतर या वादावर पडदा पडला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)