शताब्दी वर्षात रयत विद्यापीठ निर्माण होईल

नामदार प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला विश्वास
सातारा- पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1919 मध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून शिक्षणाच्या विस्तारीकरणाला चालना दिली. त्यांचाच विचार मध्यवर्ती ठेवून संस्थेने गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या आधारे महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राला दिशा देण्याचा प्रयत्न केला हे कार्य महाराष्ट्राला केवळ भूषणावह नाही तर ते दीपस्तंभा एवढे मार्गदर्शक आहे म्हणूनच रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षात रयत विद्यापीठ निर्माण होण्यासाठी आवश्‍यक ती सर्व प्रकारची मदत करून रयत विद्यापीठ निर्माण केले जाईल असा विश्वास केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री मा.नामदार प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला.

रयत शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या शताब्दी महोत्सव शुभारंभ समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार हे होते. यावेळी सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील,दिलीप बंड, डॉ. राजेंद्र जगदाळे, आनंद भदे, कर्नल रिजवी, आमदार शशिकांत शिदे, डॉ. एन. डी.पाटील, आमदार दिलीप वळसे पाटील, मीनाताई जगधने, व इतर मान्यवर उपस्थित होते.

-Ads-

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याचा गौरव करून ना. प्रकाश जावडेकर पुढे म्हणाले कर्मवीरांच्या कार्याचा सर्वात मोठा गौरव महात्मा गांधी यांनी केला आहे. “साबरमती आश्रमात मी जे करू शकलो नाही ते आपण सर्व जाती धर्मांच्या मुलांसाठी वसतिगृह निर्माण करून केले आहे. तुमच्या कार्यास माझे आशीर्वाद’ या सर्टिफिकेट सारखे दुसरे कोणतेही सर्टिफिकेट असू शकत नाही. जातिधर्म विरहीत शिक्षणाचा पाया कर्मवीरांनी घातला.त्याला अनुभावाधिष्ठित शिक्षणाची जोड दिली आणि श्रमाला प्रतिष्ठा देण्याचे महान कार्य केले आहे.

कर्मवीरांनी रयत सेवक निर्माण केले ते आजही निर्माण झाले पाहिजेत. त्यांचे विचार मध्यवर्ती ठेवून आपण आधुनिक शिक्षणाची कास धरली पाहिजे. इन्व्हशऩ, इनोव्हेशन व इन्क्‍यूबेशन च्या माध्यमातून भविष्यातील संशोधक निर्माण करण्याचे काम केले जात आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून नवा विद्यार्थी घडविण्यासाठी अटल टिंकरिंग उच्चतर आविष्कार योजना राबविल्या जात आहेत. या माध्यमातून नवनवीन शोध लावले जातील व आपला देश समृद्ध होऊ शकेल याची मला खात्री आहे असे विचार त्यांनी व्यक्त केले.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना शरद पवार म्हणाले की, शताब्दी वर्षात रयत विद्यापीठ होत आहे ते कर्मवीरांचे स्वप्न होते. कर्मवीरांनी शिक्षणाच्या सार्वत्रिकरण करणास प्राधान्य दिले. त्याला आपण गुणवत्तेची जोड दिली. आज नव्या पिढीमध्ये चिकित्सक व संशोधन प्रवृत्ती वाढेल यासाठी काम केले पाहिजे. इन्व्हशऩ, इनोव्हेशन व इन्क्‍यूबेशन च्या माध्यमातून देशाच्या विकासाला आवश्‍यक असणारा विद्यार्थी निर्माण करण्याचे काम रयत शिक्षण संस्थेने हाती घेतले आहे. या कामाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कक्षा निर्माण व्हावी यासाठी रतन टाटा यांच्या टाटा टेक्‍नोलॉजीच्या सहकार्याने आपणास पुढे जाता येऊ शकेल.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कराळे यांनी केले. यावेळी संस्थेच्या शंभर वर्षाच्या कार्याचा आढावा संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांनी घेतला. यावेळी सायन्स व टेक्‍नोलॉजी पार्कचे महासंचालक डॉ. रांजेंद्र जगदाळे, टाटा टेक्‍नोलॉजीचे डॉ. आनंद भदे, पुणे जनरलचे पोस्ट मास्टर कर्नल रिझवी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील व रयत माऊली सौ लक्ष्मीबाई पाटील याचे छायाचित्र असलेले पोस्टाचे तिकीट व पोस्टाचे पाकीट, मॅथ्यु लिखित कर्मवीर चरित्र ग्रंथाची दुसरी आवृत्ती, रयत विज्ञान पत्रिका, रयत शिक्षण पत्रिका, रयत कौशल्य विकास व इतर उपक्रम विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थितांचे आभार सहसचिव डॉ. विजयसिह सावंत यांनी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी केले. यानिमित्ताने सकाळी सातारा शहरातून विविध चित्ररथांसह प्रभात फेरी काढण्यात आली. यामध्ये चित्ररथ, लेझीम, झांज पथक, मिलिटरी व पॅरा मिलिटरी प्रशिक्षण व इतर सर्व शाखेतील शाखाप्रमुख, सेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)