शंभुराजे ट्रेकर्सची संभाजीराजेंना आगळी आदरांजली

खळद-महाराष्ट्राचा स्वाभिमान, छत्रपती संभाजीमहाराजांची जयंती साजरी करण्यासाठी अवघी मराठी तरुणाई सळसळत असताना संभाजीराजेंच्या जन्मभूमी परिसरातील बेलसरच्या काही तरुणांनी आगळ्या पद्धतीने आदरांजली वाहिली.
साकुर्डे डोंगरातील अखंड खडकात कोरलेले उन्हाळ्यामुळे कोरडे पडलेले एक पाण्याचे टाके शोधले व त्या ठिकाणी जाऊन टाक्‍यातील दगड व कचरा काढून प्राण्यांना सहज पाण्यापर्यंत पोचता येईल अशी काही दगडांची रचना केली. संध्याकाळी वनखात्याचे अधिकारी सस्ते यांच्या उपस्थितीत टॅंकरने पाणी आणून त्यामध्ये सोडले. याकामी साकुर्डे येथील टॅंकरमालक संदिप सस्ते यांनी दुर्गम भागात टॅंकर नेण्याचे धाडस करुन मोलाचे सहकार्य केले. या ठिकाणाची शांतता व प्राणीमात्रांचा एकांत सोशल मिडियापुरते निसर्गप्रेम असणारांपासुन व इतर हौशी लोकांकडून भंग होऊ नये म्हणून येथे आढळणाऱ्या प्राण्यांविषयी व टाक्‍याच्या ठिकाणाविषयी अधिक माहिती न देण्याची विनंती या सदस्यांनी केली. तसेच पावसाचे पाणी उपलब्ध होईपर्यंत हा उपक्रम सुरू ठेवण्याचे मनोगतही व्यक्त केले.
यावेळी वनखात्याला त्यांच्या विविध उपक्रमांत सहभागी होण्याचे आश्वासन देत असतानाच होऊ घातलेल्या विमानतळाबरोबर येणाऱ्या शहरीकरणाचा येथील समृद्ध निसर्गसंपदेच्या अस्तित्त्वावर विपरीत परीणाम होऊ न देता ती अबाधित राहावी म्हणून आतापासूनच प्रयत्न करण्याची विनंती ऍड. गणेश उरणे यांनी केली. तर ओंकार जगताप व आकाश बनकर यांनी येत्या पावसाळ्यात सीडबॉलचा प्रयोग व जास्तीत जास्त देशी झाडांची लागवड करण्याबाबत वनखात्यासोबत सहकार्य करण्याची इच्छा व्यक्त केली. यामध्ये विशाल हिंगणे, विनोद हिंगणे, सिद्धेश हिंगणे, अवधूत बेलसरे, मयूर गदादे, तुषार ऊरणे, सोमेश फरांदे, वेदांत हिंगणे, हर्षद गदादे सहभागी झाले होते. या सर्वांचे आभार मानताना वन अधिकारी सस्ते यांनी व्हॉटस्‌ ऍप, फेसबुक व मोबाईलमध्ये गुरफटलेला आजचा युवक भरकटला जातोय असे चित्र निर्माण होत असताना शंभूराजे ट्रेकर्ससारखे निसर्गाशी बांधिलकी जपणारे आशेचे किरण वाढीस लागावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.

  • शंभुराजे ट्रेकर्सचे समाजकार्य
    आपापले व्याप सांभाळत शंभुराजे ट्रेकर्सचे जवळपास 25 सदस्य दुर्गभ्रमण करत असतात; परंतु त्याचवेळी त्यांचा त्या-त्या परिसरात काही चांगले काम करण्याचा प्रयत्न असतो. विशेषत: गडवाटेवर व परिसरात स्वच्छता राखणे. प्लॅस्टिक, अविघटनशील कचरा गोळा करणे याचबरोबर ऐतिहासिक वास्तुंमध्ये उत्साही पर्यटकांनी खडू, चुन्याने टाकलेली नावे, चित्रे वगैरै पुसून मूळ स्थितीत आणणे, पडझड झालेल्या पायऱ्यांची शक्‍य तेवढी डागडुजी करणे व अवघड ठिकाणी इतर पर्यटकांना आधार व मदत देणे; याचप्रमाणे प्राणी व पक्षी यांच्यासाठी त्या दिवसापुरती का होईना काही खाद्यपाणी यांची व्यवस्था करणे. रस्ता अथवा मानवी संपर्कात आलेले साप, खेकडे यांसारखे जीव सुरक्षित ठिकाणी सोडणे. अशी कामे या ग्रुपकडून सुरू असतात.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)