शंभर कोटी खर्च झालेल्या “कवठे-केंजळ’चे भवितव्य अंधारात

वाई ः आजमितीला बंद असलेली कवठे-केंजळ योजना.

पाच वेळा भूमिपूजन होवूनही आजमितीला योजना अपूर्णच
27 गावांपैकी 16 गावांमधील शिवारात पोहोचले पाणी
चार वर्षात 14.5 लाख पाणीपट्टी थकीत असल्याने योजना बंद

वाई, दि. 6 (प्रतिनिधी)- वाई तालुक्‍यात धोम धरणाच्या उजव्या कालव्यावर कार्यरत असणारी कवठे-केंजळ योजना शासनाचा शंभर कोटींचा खर्च होवूनही आज मितीला ही योजना बंद अवस्थेत असल्याने तिचे भवितव्य अंधारात असल्याचे चित्र दुर्दैवाने दिसत आहे. पाटबंधारे खात्याच्या गलथान कारभाराचा उत्तम नमुना म्हणजे कवठे-केंजळ योजना होय. विधानपरिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते झालेल्या भूमिपूजनानंतर ही योजना कार्यान्वित झाली. त्याआधी या योजनेचा पाच वेळा विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून भूमिपूजन करण्यात येवूनही ही योजना 100 टक्‍के पूर्णत्वास गेलेली नाही.
या योजनेचे काम करणाऱ्या ठेकेदाराला साठ लाखांचा दंड आकारण्यात आला आहे. वाई तालुक्‍याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांसाठी जीवनदायिनी ठरलेल्या कवठे-केंजळ योजनेवर 4780 हेक्‍टर जमिनीचे भवितव्य या योजनेवर अवलंबून आहे. तसेच या योजनेच्या पाण्यावर 27 गावातील शेतजमीन ओलिताखाली येणार आहे, परंतु सध्या 16 गावातील जमिनीला व परिसरातील बंधारे भरण्यासाठी या योजनेतून पाणी पुरवठा केला जात आहे. गेल्या चार वर्षात सोळा गावातील जमिनीला सोडण्यात आलेल्या पाण्याची 14.5 लाख पाणीपट्टी ग्रामपंचायतीने न भरल्याने धोम पाटबंधारे खात्याला ही योजना बंद ठेवावी लागली आहे. ही योजना लागणारी वीज बिल हे न परवडणारे येत असल्याने शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र दिसत आहे, असे संबंधित खात्याकडून सांगण्यात आले. धोम धरणात या योजनेसाठी 1.28 टीएमसी पाणी शिल्लक ठेवण्यात येत असून यावर्षी पावसाचे प्रमाण अतिशय कमी असल्याने सोळा गावांसह उर्वरित अकरा गावांनाही धोम पाटबंधारे खात्याला पाणी पुरवठा करावा लागणार आहे. अन्यथा या भागातील शेतकरी आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे पाटबंधारे खात्याने संबंधित ग्रामपंचायतीना थकीत पाणीपट्टी भरण्यासंदर्भात नोटीसा काढण्यात आलेल्या आहेत. थकीत पाणी पट्टी भरल्याशिवाय ही योजना चालू करण्यात येणार नसल्याचेही संबधित विभागाकडून सांगण्यात आले आहे.
तसेच ही योजना कायम स्वरूपी चालू ठेवण्यासाठी शासनाला या योजनेसाठी लागणारे लाईट बिल भरावे लागणार आहे. तरच खऱ्या अर्थाने या भागातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लागल्याचे दिसेल अन्यथा शंभर कोटी खर्च होवूनही तिचे भवितव्य अंधारातच आहे असे दुर्दैवाने म्हणावे लागेल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

योजना कार्यान्वित असलेली गावे
वाई तालुक्‍याच्या पूर्व भागासाठी जीवनदायिनी ठरलेली कवठे-केंजळ योजना ही सत्तावीस गावांसाठी तयार करण्यात आलेली आहे. परंतु सध्या 16 गावातील शेतीलाचा या योजनेच्या पाण्याचा उपयोग होत आहे. यामध्ये परखंदी, शेंदुरजणे, लोहारे, बोपर्डी, केंजळ, खानापूर, कवठे, वहागांव, म्होडेकरवाडी, सुरूर, वेळे, गुळुंब, चांदक, बोपेगांव, पांडे, विठ्ठलवाडी या गावांना या योजनेचा लाभ होत आहे. तर उर्वरित अकरा गावांतील या योजनेचे काम पूर्णत्वास आले असून दोन टक्केच काम बाकी राहिले आहे. ते येणाऱ्या मार्चपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे पाटबंधारे खात्याने दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

15 मार्चपर्यंत योजना कार्यान्वित होणार
कवठे-केंजळ या योजनेवर जवळपास शंभर कोटींचा खर्च झाला आहे. सोळा गावांमध्ये यशस्वीरित्या पाणी पोहोचले असून उर्वरित अकरा गावांना या योजनेचा लवकरच लाभ मिळणार आहे. उर्वरित गावांतील दोन किमी अंतराचे काम बाकी असून ते थोड्याच दिवसात पूर्ण होणार आहे. येणाऱ्या 15 मार्चपर्यंत ही सुरळीत चालू होणार आहे, परंतु, त्याआधी ग्रामपंचायतीनी त्वरित पाणी पट्टी भरून खात्याला सहकार्य करावे.
:- धोम पाटबंधारे विभाग वाई,


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)