व्हीनस, आझारेन्का, स्विटोलिना उपान्त्यपूर्व फेरीत

मियामी ओपन टेनिस स्पर्धा
मियामी – आठव्या मानांकित व्हीनस विल्यम्सने 11 व्या मानांकित योहाना कॉन्टाचे आव्हान मोडून काढताना मियामी ओपन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत धडक मारली. तसेच चतुर्थ मानांकित एलेना स्विटोलिना व सहावी मानांकित येलेना ऑस्टापेन्को या मानांकितांसह बिगरमानांकित व्हिक्‍टोरिया आझारेन्कानेही चमकदार विजयांसह उपान्त्यपूर्व फेरी गाठली.

मातृत्वानंतर पुनरागमन करण्याचे सेरेना विल्यम्सचे प्रयत्न सुरू असताना तिची थोरली बहीण आणि महिला टेनिसमधील सर्वाधिक वयस्कर खेळाडू व्हीनसनेही आपली आगेकूच कायम राखली आहे. इंग्लंडची अव्वल खेळाडू असलेल्या योहाना कॉन्टाने पहिला सेट जिंकून सनसनाटी निकालाची तयारी केली होती. परंतु व्हीनसने अनुभवाच्या जोरावर पुढचे दोन्ही सेट जिंकताना 5-7, 6-1, 6-2 अशी बाजी मारली व अखेरच्या आठ खेळाडूंमध्ये स्थान मिळविले.

अन्य लढतींमध्ये चतुर्थ मानांकित एलेना स्विटोलिनाने 21व्या मानांकित ऍश्‍ले बार्टीचा 7-5, 6-4 असा झुंजार पराभव करीत आगेकूच केली. तर सहावी मानांकित येलेना ऑस्टापेन्कोने नवव्या मानांकित पेट्रा क्‍विटोव्हाचे आव्हान पहिल्या सेटमधील टायब्रेकरमध्ये वर्चस्व गाजविल्यानंतर 7-6, 6-3 असे संपुष्टात आणले. बिगरमानांकित व्हिक्‍टोरिया आझारेन्काने 30व्या मानांकित ऍग्नेस्का रॅडवन्स्काचा प्रतिकार 6-2, 6-2 असा मोडून काढत उपान्त्यपूर्व फेरी गाठली.

एकेरीतील आव्हान संपलेल्या ऍश्‍ले बार्टीने महिला दुहेरीत मात्र कोको वान्डेवेघेच्या साथीत व्हॅनिया किंग व कॅटरिना स्रेबोटनिक यांच्यावर 6-1, 6-3 असा विजय मिळवीत उपान्त्यपूर्व फेरी गाठली. तसेच रॉडिनोव्हा व किचनोक या जोडीने आयोमा व झांग या जोडीचा 6-2, 6-3 असा पराभव करीत आगेकूच केली. एलेना व्हेस्निना व एकेटेरिना माकरोव्हा या अग्रमानांकित जोडीनेही योहाना कॉन्टा व हीथर वॉटसन या जोडीचा प्रतिकार 7-5, 6-4 असा संपुष्टात आणताना उपान्त्यपूर्व फेरीत आपले आव्हान कायम राखले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)