व्हिडीओकॉनला 3250 कोटींचे कर्ज दिल्याने चंदा कोचर अडचणीत

मुंबई – व्हिडीओकॉन समुहाला 3,250 कोटी रुपयांचे कर्ज दिल्याने आयसीआयसीआय बॅंकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर अडचणीत आल्या आहेत. चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्यासोबत व्हिडीओकॉन समुहाचे अध्यक्ष वेणुगोपाळ धूत यांनी 2008 मध्ये एक कंपनी सुरु केली होती आणि धूत यांनी आयसीआयसीआय बॅंकेकडून कर्ज मिळताच अवघ्या 9 लाख रुपयांमध्ये दीपक कोचर यांना ती कंपनी विकल्याचे समोर आले आहे. आता हे सर्व व्यवहार तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहेत.

याबाबत एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या वृत्तानुसार दीपक कोचर आणि वेणुगोपाळ धूत यांनी डिसेंबर 2008 मध्ये न्यू पॉवर रिन्यूएबल्स (एनआरपीएल) ही कंपनी सुरु केली होती. धूत यांच्याकडे या कंपनीत 50 टक्के समभाग होते. तर उर्वरित समभाग दीपक कोचर यांच्या कंपनीकडे होते. या कंपनीचे नाव पॅसिफिक कॅपिटल असे असून दीपक कोचर यांच्या वडिलांकडे या कंपनीची मालकी आहे. तर या कंपनीत चंदा कोचर यांच्या भावाची पत्नी देखील सक्रीय आहेत.
धूत यांनी एनआरपीएलच्या संचालकपदाचा जानेवारी 2009 मध्ये राजीनामा दिला आणि कोचर यांना कंपनीचे शेअर्स 2. 5 लाख रुपयांमध्ये विकले. मार्च 2010 मध्ये न्यू पॉवरला धूत यांची मालकी असलेल्या सुप्रीम एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून 64 कोटी रुपयांचे कर्ज घ्यावे लागले. यानंतर मार्च 2010 च्या अखेरपर्यंत न्यू पॉवरमधील 94.99 शेअर्सचा वाटा सुप्रीम पॉवरकडे गेला.

धूत यांनी नोव्हेंबर 2010 मध्ये सुप्रीम एनर्जीचे मालकी हक्क महेश पुगलिया यांच्याकडे दिले. पुंगलिया यांनी हीच कंपनी एप्रिल 2013 मध्ये दीपक कोचर मॅनेजिंग ट्रस्टी असलेल्या ‘पिनॅकल’च्या ताब्यात दिली. विशेष म्हणजे ही कंपनी अवघ्या 9 लाखांमध्ये विकण्यात आली. एकीकडे हे व्यवहार होत असतानाच दुसरीकडे व्हिडीओकॉन समुहाला 3,250 कोटी रुपयांचे कर्ज चंदा कोचर मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या आयसीआयसीआय बॅंकेने दिले. हे कर्ज एप्रिल 2012 मध्ये देण्यात आले होते. यातील 2,810 कोटी रुपयांचे थकीत होते. हे 2017 मध्ये बुडीत कर्ज म्हणून जाहीर करण्यात आले. आता कोचर कुटुंबीय आणि धूत यांच्यातील हे सर्व व्यवहार आणि बॅंकेचे बुडालेले कर्ज हे संशयाच्या भोवऱ्यात आले आहे. या व्यवहारांची तपास यंत्रणांकडून चौकशी होण्याची शक्‍यता आहे.

याबाबत आयसीआयसीआय बॅंकेने प्रतिक्रिया दिली आहे. आर्थिक हितसंबंधांचा प्रश्नच निर्माण होत नाही. या सर्व अफवा असून चंदा कोचर यांच्यावर बॅंकेच्या संचालक मंडळाचा विश्वास आहे. अशा अफवा बॅंकेची प्रतिमा मलिन करण्यासाठीच पसरवल्या जात असल्याचे बॅंकेने स्पष्ट केले आहे. तर हे आरोप वेणूगोपाल धूत यांनी देखील फेटाळून लावले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)